उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, राहुरी कृषी विद्यापीठच्या संघाने विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत सुरुवातीपासूनच सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुलीच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाने विजयाची घौडदौड शेवट पर्यंत सुरु ठेवली. त्यांचा अंतिम सामना सोमय्या विद्यालयाबरोबर झाला. यामध्ये सोमय्या विद्यालयाचा पराभव करुन सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुलींचा संघ विजयी ठरला.
या स्पर्धेत जिल्ह्यातून आठ संघांनी सहभाग घेतला होता.
सर्व विद्यार्थिनींनी सांघिक प्रयत्नातून हे यश मिळविले असून, त्यांना क्रीडा शिक्षक घनश्याम सानप, एनसीसी प्रमुख संतोष जाधव व तुकाराम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत पाटील, अधीक्षक प्रमोद रसाळ, सचिव महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, माजी क्रीडा शिक्षक शमशुद्दीन इनामदार, मुख्याध्यापिका आशा धनवटे, उपमुख्याध्यापक अरुण तुपविहिरे, पर्यवेक्षक बाळासाहेब डोंगरे आदींसह सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

