• Fri. Sep 19th, 2025

जातीयवादी प्रवृत्तीतून झालेल्या बोंडार हवेली खून प्रकरणाचा रिपाईच्या वतीने निषेध

ByMirror

Jun 12, 2023

खून प्रकरणातील आरोपींना फाशी देऊन यामागील सूत्रधार शोधावा -सुनिल साळवे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जातीयवादी प्रवृत्तीतून बोंडार हवेली (जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील नियुक्त करावा व या घटनेचा प्रमुख सूत्रधार शोधण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर या घटनेचा रिपाईच्या वतीने निषेध नोंदविला आहे.

सुनिल साळवे


फुले, शाहू, छत्रपती आणि आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावात साजरी केल्याचा राग मनात धरून अक्षय भालेराव या युवकाची हत्या करण्यात आली. ही घटना सोशल मीडियावर प्रसिध्द करुन खून केल्याची कबुली देणार्‍यांचे पाठीराखे कोण?, याचा सुत्रधार कोण?, पुर्वनियोजित खूनातील मास्टरमाईंडच कोण? असल्याचा प्रश्‍न उपस्थित करुन त्यांचा शोध घेण्याचे म्हंटले आहे.


या प्रकरणातील 8 आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. एक आरोपी अद्यापि फरार आहे. त्याला ताबडतोब अटक व्हावी, फक्त अटक करुन न थांबता या खून प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील कलम 120 ब नुसार दोन जातीमध्ये तणाव निर्माण करणे, दंगल भडकविणे, राज्यातील शांतता व सुव्यवस्था बिघडविणे, देशद्रोहाचे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊन अटक करावी. अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई केल्यास अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे खून होणार असतील तर पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांचा खून झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


खून झालेल्या अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियांना शासनाने 50 लाख रुपयाची मदत करून त्या कुटूंबाचे पुनर्वसन करावे, त्या कुटूंबास पोलीस संरक्षण दयावे, कुटबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी, हा खटला जलदगती न्यायालयाच चालवण्यासाठी विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *