इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस मध्ये नोंद
26 किलोमीटरचे अंतर बॅकस्ट्रोक पद्धतीने 5 तास 32 मिनिटात पूर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळ अहमदगरचे असलेले सचिन शेकटकर यांचा 12 वर्षीय मुलगा नील शेकटकरने बेलापूर जट्टी (नवी मुंबई) ते गेट वे ऑफ इंडिया हे 26 किलोमीटरचे अंतर बॅकस्ट्रोक पद्धतीने पूर्ण केले असून, या कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस मध्ये नोंद झाली आहे.

जलतरणातील अतिशय अवघड समजल्या जाणार्या बॅकस्ट्रोक पद्धतीने हे अंतर पार करणारा तो जगातील सर्वात कमी वयाचा साहसी जलतरणपटू ठरला आहे. बेलापूर जट्टी येथून त्याने रात्री 12:54 मिनिटांनी उडी घेऊन पहाटे 6:34 मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचून 5 तास 32 मिनिटात हे अंतर पूर्ण केले. हा नवीन विक्रम स्वतःच्या नावावर कोरण्याचे भाग्य निल शेकटकरला लाभले आहे. सचिन शेकटकर हे शहरातील बागडपट्टी येथील रहिवाशी असून, सध्या ते मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत आहे. त्यांचा मुलगा मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. नौदल अधिकारी होण्याचे स्वप्न अतिशय कमी वयामध्ये उराशी बाळगून त्याची यशाची घोडदोड सुरु आहे. या यशाबद्दल त्याचे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तत्पूर्वी नील उरणच्या समुद्रात एक दिवस आड चार ते पाच तास रात्री सराव करीत होता. दिवसातून एकदा फादर अॅग्नल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वाशी, नवी मुंबई येथे सात ते आठ तास सलग सराव केला. त्याने प्रशिक्षक संदीप यादव, अमित आवळे, किशोर पाटील व गोकुळ कामात या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. नीलच्या मातोश्री हेमांगी शेकटकर यांनी त्याच्या सकस व पौष्टिक आहाराची अतिशय काळजी घेतल्याने, त्याला हा विक्रम करणे शक्य झाले. या कामगिरीसाठी नीलला वडील सचिन शेकटकर, मुंबई येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, मुंबई बाजार समिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ यांचे सहकार्य लाभले.

