युवतींनी शहरातून काढली जी 20 जनभागीदारी योजनेची माहिती देणारी रॅली
कौशल्य प्राप्तीतून राष्ट्रहित साधने शक्य -निशांत सुर्यवंशी
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय संचलित जनशिक्षण संस्थेत जी 20 जनभागीदारी योजनेतंर्गत साजरा होत असलेल्या पंधरवाड्याचा शुभारंभ जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त निशांत सुर्यवंशी यांच्या हस्ते झाले. तर शहरातून जी 20 जनभागीदारी योजनेची माहिती देणारी जनजागृती रॅली काढण्यात आली.
भारत मातेचा जय घोष करीत निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. यामध्ये युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमासाठी जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, व्हाईस चेअर पर्सन मनिषा शिंदे, दिपाली मोढवे, पुष्पा मोरे, हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, कार्यक्रम सल्लागार समितीच्या सदस्या कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, लेखापाल अनिल तांदळे, प्रशिक्षिका मंगल चौधरी, माधुरी घाटविसावे आदींसह संस्थेतील प्रशिक्षणार्थी युवती, महिला व प्रशिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बाळासाहेब पवार म्हणाले की, भारत हा तरुणांचा देश आहे. युवकांमध्ये कौशल्यक्षम शिक्षण निर्माण करून सक्षम भारत घडणार आहे. हेच जी 20 परिषदेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मनिषा शिंदे यांनी महिलांनी स्वत:मध्ये क्षमता निर्माण करून सक्षम व्हावे. क्षमता निर्माण होण्यासाठी व्यावसायिक शिक्षण काळाची गरज बनली असल्याचे स्पष्ट केले. कमल पवार यांनी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात 35 हजार महिला, युवती व युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात आले आहे. ग्रामीण भागात देखील गावी-गावी जाऊन प्रशिक्षणाची व्यवस्था करून देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
निशांत सुर्यवंशी म्हणाले की, विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देऊन आपल्या देशाचा विकास साधण्यासाठी जी 20 परिषदेचा उपक्रम आहे. कौशल्य प्राप्तीतून राष्ट्रहित साधने शक्य होणार आहे. जी 20 शिखर परिषदेच्या माध्यमातून देशाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देश हा विश्व गुरु करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी उचललेले पाऊल दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश खामकर यांनी जी 20 शिखर परिषदेच्या माध्यमातून देशातील एकमेकांच्या विचार प्रणालीचे अदान-प्रदान करुन उद्योग, व्यवसायाला चालना देण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा शिंदे यांनी केले. आभार शफाकत सय्यद यांनी मानले.

जी 20 जनभागीदारी योजनेच्या पंधरवडा 1 ते 15 जून पर्यंत चालणार आहे. यामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, कौशल्य प्रश्नमंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध, घोषवाक्य, योग व विविध क्रीडा स्पर्धेचा समावेश आहे. तर स्वच्छता अभियान, वृक्षरोपणा सारख्या सामाजिक उपक्रम घेऊन युवक-युवतींना उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे व्याख्यानाच्या माध्यमातून करियर मार्गदर्शन केले जाणार आहे.