• Fri. Apr 24th, 2026

नागापूर जिल्हा परिषद शाळेचे चाँद शेख यांना पुरस्कार जाहीर

ByMirror

Apr 23, 2026

छत्रपती संभाजी महाराज गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने होणार गौरव


शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना यंदाचा ‘छत्रपती संभाजी महाराज गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सहाव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी दिली.


स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव वाघा (ता. नगर) येथे रविवार, दि. 17 मे रोजी हे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
चाँद हुसेन शेख यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांना घडवून त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा दिली आहे.

शिक्षणाबरोबरच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे ते उत्कृष्ट पोवाडा गायक असून सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा बजावली, त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळांच्या इमारती उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. किन्ही (पारनेर), दरेवाडी (नगर), हिवरेझरे (नगर), कनोली (संगमनेर), नाचनगाव (अकोले) आणि नवनागापूर (नगर) येथील शाळांच्या इमारतींची कामे त्यांनी यशस्वीरीत्या मार्गी लावली आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


पुरस्कार जाहीर झाल्यानंतर साहित्यिक प्रतिभा खैरनार, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, प्रा. गणेश भगत, कवयित्री सरोज आल्हाट, बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब कदम, कवी गीताराम नरवडे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, निवृत्ती महाराज कानवडे, राजेंद्र घोडके तसेच लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, बाळासाहेब मुनतोडे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *