• Thu. Jan 29th, 2026

घाम गाळणे म्हणजे योग नव्हे -सागर पवार

ByMirror

Feb 6, 2023

महिलांना निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी योग-प्राणायामाचे धडे

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योग-प्राणायामशिवाय पर्याय नाही. घाम गाळणे म्हणजे योग नव्हे, शास्त्रीय अचूक पध्दतीने योग केल्यास त्याचे निश्‍चित फायदे शरीराला मिळत असल्याचे प्रतिपादन सुख योगाचे योग गुरु सागर पवार यांनी केले.


प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांच्या निरोगी आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी योग-प्राणायामबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी योग गुरु पवार बोलत होते. याप्रसंगी मनिषा भागानगरे, गितांजली भागानगरे, ग्रुपच्या अध्यक्ष अलकाताई मुंदड, उपाध्यक्षा सविता गांधी, सचिव शोभा पोखर्णा, अनिता काळे, छाया राजपूत, हिरा शहापूरे, शशिकला झरेकर, स्वप्ना शिंगी, साधना भळगट, सुजाता पूजारी, सारिका कासट, जयश्री पुरोहित, उषा गुगळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पुढे योग गुरु पवार म्हणाले की, तणावाने आजाराच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तीचे इंद्रिय त्याच्या इच्छेप्रमाणे कार्यरत नसतात. इंद्रियांवर ताबा मिळविण्यासाठी प्राणायाम कार्य करतो. ध्यानद्वारे विचारांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करता येते. यामुळे नैराश्यपूर्ण जीवन आनंदी बनत असते. तणावामुळे जीवन निरुत्साह व व्याधींनी व्यापले जात आहे. योग-प्राणायामद्वारे स्वत:ला वेळ दिल्यास जीवनात आनंद व उत्साह निर्माण होऊन निरोगी जीवन जगता येणार आहे. मन शांत नसल्यास चिडचिड होऊन कामात एकाग्रता निर्माण होत नाही. त्यामुळे अनेक कामे व निर्णय चुकत असल्याचे सांगितले. तर त्यांनी महिलांना निरोगी आरोग्यासाठी योग आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग बनविण्याचे आवाहन केले. आदिती परदेशी यांनी विविध आसने अचुक पध्दतीने करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.


प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी महिलांच्या आरोग्यासाठी ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. यामुळे कुटुंबातील महिलांचे आरोग्य धोक्यात येते. महिलांना घरातच योग करता यावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी महिलांसाठी दिप्ती मुंदडा यांनी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना कार्यक्रमाचे प्रायोजक सुहाना मसालाचे विशाल घोडके यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका कासट यांनी केले. ग्रुपच्या उपाध्यक्षा अनिता काळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *