सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या अंगणाची केली स्वच्छता
घरेलू मोलकरीनींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- घरेलू कामगारांना कल्याण महामंडळाकडून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून नवदुर्गा जागर आंदोलनाची सुरुवात केली. या आंदोलनातंर्गत सोमवारी (दि.26 सप्टेंबर) घरेलू मोलकरीण कामगारांनी शासनाचा निषेध व्यक्त करीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता केला. या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, कल्पना सामंत, आशा शिंदे, सविता धाडगे, हिराबाई जरे, सविता शिंदे, मिरा कुर्हे, यमाबाई चव्हाण, कमल वाकचौरे, रेशमा मिरपगार आदी घरेलू मोलकरीण महिला सहभागी झाल्या होत्या.
घटस्थापनेची सोमवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास सुट्टी असताना देखील महिलांनी कार्यालयाचे अंगण, प्रवेशद्वार व फलकाची स्वच्छता करुन शासनाचे लक्ष वेधले. यावेळी घरेलू मोलकरीण महिलांनी शासकीय योजनांचा लाभ मिळण्याच्या जोरदार घोषणा दिल्या. मंगळवारी दुसर्या माळेला घंटानाद, तिसर्या माळेला बुधवारी देवीचा गोंधळ, चौथ्या माळेला गुरुवारी थाळीनाद, पाचव्या माळेला शुक्रवारी भजन, सहाव्या माळेला शनिवारी आरती, सातव्या माळेला रविवारी होम-हवन, आठव्या माळेला सोमवारी अष्टमी पूजन, नवव्या माळेला मंगळवारी बोंबाबोंब आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा म्हणाल्या की,महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या घरेलू कामगार कल्याण मंडळाकडून नियोजित असणार्या योजजांची अंमलबजावणी 2016 ते 2017 पासून करण्यात आलेली नाही. आजपर्यंत घरेलू कामगारांना कोणत्याही योजनांचा लाभ मिळाला नसल्याने त्यांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरेलू कामगार महिला घटस्थापने पासून नऊव्या माळे पर्यंत नवदुर्गा जागर आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
