सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर नऊ दिवस चालणार आंदोलन
घरेलू मोलकरीनींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- घरेलू कामगारांना कल्याण महामंडळाकडून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने घरेलू मोलकरीण कामगारांनी शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी नवरात्रीमध्ये नवदुर्गा जागर आंदोलनाची हाक दिली आहे. क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन केले जाणार असून, आंदोलनाची नोटीस व घरेलू मोलकरीण कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा यांनी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कौले यांना दिले.
महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या घरेलू कामगार कल्याण मंडळाकडून नियोजित असणार्या योजजांची अंमलबजावणी 2016 ते 2017 पासून करण्यात आलेली नाही. आजपर्यंत घरेलू कामगारांना कोणत्याही योजनांचा लाभ मिळाला नसल्याने त्यांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरेलू कामगारांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नसल्याचे शहरातील घरेलू कामगार महिला घटस्थापने पासून नऊव्या माळे पर्यंत नवदुर्गा जागर आंदोलन करणार असल्याचे अनिता कोंडा यांनी सांगितले आहे.
पहिल्या माळेपासून सोमवारी (दि.26 सप्टेंबर) घटस्थापनेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाची स्वच्छतेने आंदोलनाची सुरुवात होणार आहे. मंगळवारी दुसर्या माळेला घंटानाद, तिसर्या माळेला बुधवारी देवीचा गोंधळ, चौथ्या माळेला गुरुवारी थाळीनाद, पाचव्या माळेला शुक्रवारी भजन, सहाव्या माळेला शनिवारी आरती, सातव्या माळेला रविवारी होम-हवन, आठव्या माळेला सोमवारी अष्टमी पूजन, नवव्या माळेला मंगळवारी बोंबाबोंब आंदोलन केले जाणार आहे.
घरेलू कामगारांना शासनाकडून मिळणार्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची मागणी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
