नवदुर्गा जागर आंदोलन
लेखी आश्वासनाने आंदोलन स्थगित
अहमदनगर (प्रतिनिधी)- घरेलू कामगारांना कल्याण महामंडळाकडून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नवदुर्गा जागर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आंदोलनाच्या दुसर्या माळेनिमित्त मंगळवारी (दि.27 सप्टेंबर) घरेलू मोलकरीण कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर घंटानाद आंदोलन केले.
या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, बबीता सत्राळकर, मंगल गायकवाड, सारा वाकडे, अन्वरी रंगरेज, प्रमिला रोकडे, अरुणा शिंदे, उषा बोराडे, ज्योती बोरुडे, कमळ सिद्दम, रेखा पाटेकर आदींसह घरेलू मोलकरीण महिला सहभागी झाल्या होत्या.
घरेलू मोलकरीण महिलांनी शासकीय योजनांचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्या. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या घरेलू कामगार कल्याण मंडळाकडून नियोजित असणार्या योजजांची अंमलबजावणी 2016 ते 2017 पासून करण्यात आलेली नाही. आजपर्यंत घरेलू कामगारांना कोणत्याही योजनांचा लाभ मिळाला नसून, शासकीय योजनांचा लाभ मिळण्याची मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी सध्या घरेलू कामगारांची नोंदणी सुरु असून, वरिष्ठ कार्यालयात निवेदन सादर करुन पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर पुढील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. संघटनेच्या अध्यक्षा कोंडा यांनी शासनाकडून घरेलू मोलकरीण कामगारांची दखल न घेतली गेल्यास व शासकीय योजनांचा लाभ न मिळाल्यास यापुढे बेमुदत आंदोलन केले जाणार असल्याचे सांगितले.
