किरण दंडवते यांचे नाव खोट्या गुन्ह्यातून वगळण्याची मागणी
जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- घटनास्थळी हजर नसताना देखील किरण दंडवते यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यातून नाव वगळण्याची मागणी त्यांची पत्नी मंगल दंडवते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अशोक वाळके, सशीला वाणी, गायत्री वाळके, अमोल वाळके, जयंत भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
13 मार्च रोजी भळगट कॅन्टीन येथे आकाश दंडवते व योगेश गलांडे यांच्यात शाब्दीक वाद झाले होते. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये योगेश गलांडे याने किरण बबन दंडवते यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षदर्शी त्यावेळी ते घरी झोपलेले असताना त्यांना सदर गुन्ह्यात अडकविण्यात आले असल्याचे मंगल दंडवते यांनी निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, किरण दंडवते यांच्या मोबाईलचा सीडीआर रिपोर्ट तपासून त्यांना खोट्या गुन्ह्यातून वगळण्याची मागणी मंगल दंडवते यांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास दहा दिवसानंतर पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.