फायनान्स कंपनीशी संगनमत करुन ग्राहकांच्या नावावर प्रमाणापेक्षा अधिक रकमा काढल्याचा आरोप
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर येथील घरकुल प्रकल्पात अनेक घरे घेतलेल्या अनेक नागरिकांच्या नावावर फायनान्स कंपनीकडून मोठ्या प्रमाणात रकमा काढल्याप्रकरणी त्या बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व तक्रारदार विजय लोंढे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 2017 पर्यंत सदरचे काम पूर्ण करण्याचा कार्यकाळ असताना देखील या प्रकल्पाचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नवनागापूर येथील प्लॉट नंबर 55, 56 व 57 येथील प्लॉटचे एकत्रीकरण करुन 1042.37 चौरस मीटर क्षेत्रावर राहुरी फॅक्टरी येथील एका बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटची स्किम केली होती. सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करुन फ्लॅट विकत घेणार्याकडून प्रमाणापेक्षा अधिक रकमा घेऊन त्यांची फसवणुक करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खासगी फायनान्स कंपनीशी संगणमत करून मोठ्या प्रमाणात रकमा काढल्या. तक्रारदाराला पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात काम अपूर्ण असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणावर एमआयडीसी पोलीस स्टेशनने प्रकाश टाकून बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली. बांधकाम करण्याचा कार्यकाळ 2017 अखेर पूर्ण होण्याचा होता. परंतु ते काम अद्यापि अपूर्ण आहे. फ्लॅट घेणारे सर्व ग्राहक सर्वसामान्य नागरिक व कामगार वर्गातील आहे. या बांधकाम व्यावसायिकाने फसवणुक केल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
तब्बल 20 लोकांची या बांधकाम व्यावसायिका विरोधात तक्रार असून, सदरील बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूल सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यस सर्व तक्रारदारांसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.