• Wed. Jul 2nd, 2025

ग्रामीण साहित्य संमेलनात सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचा सन्मान

ByMirror

Jul 11, 2023

साहित्य क्षेत्रातील कार्य, नवोदित कवींना प्रोत्साहन व वाचन संस्कृती रुजविण्याच्या कार्याबद्दल गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.भा. मराठी साहित्य परिषद व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषद बेलवंडी शाखेच्या वतीने झालेल्या वीसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनात सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला.


कविवर्य तथा गीतकार प्रवीण दवणे, निवृत्त न्यायमुर्ती वसंतराव पाटील व ज्येष्ठ साहित्यिक तथा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे यांच्या हस्ते डोंगरे यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, देविदास बुधवंत, कवी रज्जाक शेख, आनंदा साळवे, संयोजक अशोक शर्मा उपस्थित होते.


या संमेलनात कवींनी मनाला भिडणारे व ह्रदयाचा ठाव घेणार्‍या कवितांचे सादरीकरण केले. उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. सुभाष सोनवणे म्हणाले की, ग्रामीण भागात असा साहित्यिक उत्सव अत्यंत महत्वाचा असून, त्यामुळे ग्रामीण प्रतिभेला धुमारे फुटतील. हा साहित्योत्सव रसिकांचा होणे आवश्यक आहे. परिसरातील अनेकांना यात सामावून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, साहित्यिक व कवी समाजाचे प्रश्‍न मांडून जनतेला जागरुक करुन व्यवस्थेला जाब विचारत असतात. हे प्रश्‍न मांडताना समाजाला दिशा देण्याचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे. ग्रामीण साहित्य संमेलनातून नवीन साहित्यिक व कवींना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. डोंगरे यांचे साहित्य क्षेत्रात सुरु असलेले कार्य, कवी संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवींना प्रोत्साहन व ग्रामीण भागात वाचनालयाच्या माध्यमातून त्यांनी वाचन संस्कृती रुजविण्यासाठी चालवलेल्या चळवळीबद्दल त्यांचा या साहित्य संमेलनात सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *