डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचा इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाची मोहीम
देशात गुलामी व दहशतीचे नाजी पर्व सुरू -जालिंदर चोभे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त गावोगावी ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत ईव्हीएम बंद करून बॅलेट वरच मतं प्रक्रिया व्हावी असा ठराव पास करून केंद्र सरकार, राज्य सरकार, निवडणूक आयोग व राष्ट्रपतींना पाठविण्याचे आवाहन इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाच्या वतीने जालिंदर चोभे मास्तर यांनी केले आहे.
निवडणुकीत ईव्हीएममुळे अनेक घोटाळे उघडकीस येत असताना ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया होण्यासाठी अनेक संघटना मागणी करत आहे. मात्र भाजप सरकार या ईव्हीएममुळे सत्तेत असल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाच्या वतीने करण्यात आला आहे. लोकशाही टिकविण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया होणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी घटनेने दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता व कल्याणकारी राज्य घटना वाचविण्यासाठी ईव्हीएम विरोधात ठराव घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतच्या ठरावाला पार्लमेंटच्या ठरावा सारखीच किंमत घटनेने बहाल केलेली आहे. ग्रामपंचायतचा ठराव कोणीही नाकारू शकत नाही . मग घटनेतील तरतुदीनुसार सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यावा लागेल. ईव्हीएम ऐवजी बॅलेटवर मतप्रक्रिया राबविल्यास हुकुमशाही संपुष्टात येणार असल्याचे चोभे यांनी म्हंटले आहे.
देशात गुलामी व दहशतीचे नाजी पर्व सुरू झाले आहे. शिक्षण, स्वातंत्र्य, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेचे वाटोळे करण्यात आले. उद्योगपती मित्रांचे 11 लाख कोटी रुपयाचे कर्ज माफ केले. कामगार कायदे रद्द करून सर्वत्र कंत्राटी कामगार धोरण राबवून कामगारांना भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम करण्यात आले आहे. कामाचे तास आठ वरून बारा झाले आहेत. लघुउद्योजक, शेतकर्यांचे दिवाळे काढले. भारतीय राज्यघटनेची मोडतोड करण्यासाठी विना चर्चा अन्यायकारक कायदे पास करून लोकशाहीच्या नावाने तानाशाहीचे एकाधिकारशाहीचे शासन भाजप सरकार राबवित असल्याचा आरोप चोभे यांनी केला आहे.