प्रकरण दाबणार्या वैद्यकिय अधिकारीवर देखील कारवाईची केली मागणी
जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून दिले निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- गर्भ लिंग निदान केलेल्या व चूकीचा सल्ला देऊन गर्भपातसाठी प्रवृत्त करणार्या त्या डॉक्टर व संगमनेरचे दोषी वैद्यकिय अधिकारीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्वत: कौटुंबिक कारणामुळे गर्भपात करण्यासाठी गेलेल्या महिलेने जिल्हाधिकारी डॉ. सिध्दाराम सालीमठ यांची भेट घेऊन निवेदन दिले.
कोल्हार (ता. राहता) येथील तक्रारदार महिलेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मी पाच महिन्यांची गर्भवती असताना कौटुंबिक कारणामुळे गर्भ नको होता. त्यासाठी राहुरी येथील एका डॉक्टरांकडे सोनोग्राफीसाठी गेले होते. गर्भलिंग निदान करण्यापूर्वी डॉक्टरांना 20 हजार रुपये फी स्वरूपात दिले. मला हा गर्भ मुलीचा असल्याचे सांगितले व मला गर्भपात करण्यासही संगमनेर तालुक्यातील आश्वी या गावी एका डॉक्टरकडे जाण्यास सांगितले.
18 मे रोजी गेले असता तेथील डॉक्टरांनी गर्भपात करण्यासाठी 20 हजार रुपयाची मागणी केली. त्याप्रमाणे त्यांची फी दिली व उपचार सुरू केले. त्यानुसार त्यांनी 19 मे रोजी रुग्णालयात दाखल करून गर्भपाच्या गोळ्या दिल्या. परंतु त्या दिवशी तेथे संगमनेर येथील वैद्यकीय अधिकार्यांची रेड झाली व माझ्या गर्भपात होऊ शकला नाही. सदर अधिकार्यांनी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे तीन दिवस उपचारासाठी ठेवले.
मला माझी चूक लक्षात आली आहे. परंतु मला या चुकीचा सल्ला देणार्या डॉक्टरांवर कारवाई झालेली नाही. हे प्रकरण संगमनेर येथील वैद्यकीय अधिकार्यांनी दाबले असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. तर जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.