शहरात जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन
तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या स्पर्धेला तीनशे खेळाडूंचा सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळ हा जीवनात संघर्ष करायला शिकवतो. खेळाने अपयश पचविण्याचे व विजयानंतर पुढील ध्येय गाठण्याचे गुण विकसीत होत असतात. मुलांना घडविण्यासाठी व सर्वांगीन विकासासाठी त्यांना मैदानी खेळाकडे पालकांनी घेऊन जाण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन वाडियापार्क क्रीडा संकुल येथे आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, प्राध्यापक संजय धोपावकर, क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, बाळासाहेब हराळ, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, दिपाली बोडखे, विल्सन फिलिप्स, विशाल गर्जे, तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा सचिव घनश्याम सानप, सहसचिव दिनेश गवळी, खजिनदार नारायण कराळे, तायक्वांदोचे मार्गदर्शक गणेश वंजारे, अल्ताफ खान, जय काळे, प्रविण गिते, धर्मनाथ घोरपडे, राष्ट्रीय पंच योगेश बिचितकर आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात घनश्याम सानप यांनी खेळाडूंचा विकास साधण्यासाठी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन प्रयत्नशील आहे. या स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन व इंडिया तायक्वांदो यांच्या मान्यतेने घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी जीवनामध्ये स्पर्धा नसेल, तर जीवन नीरस होते. खेळाच्या माध्यमातून खेळाडूंना शिस्त व चांगल्या सवयी लागतात. खेळाने शारीरिक व बौध्दिक विकास साधला जात असल्याचे सांगितले. फटाक्यांच्या आतषबाजीत या स्पर्धेचे थाटात उद्घाटन सोहळा पार पडला. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 14 वर्ष वयोगट आतील सुमारे 350 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यावेळी रंगतदार सामने रंगले होते. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली.

