निम्मी रक्कम तात्काळ व उर्वरीत कर्जाची रक्कम मुदतवाढीने भरण्याची तयारी असताना देखील फायनान्स कंपनीचा घरावर डोळा
मानसिक त्रास दिल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याचा कर्जदाराचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या टाळेबंदीत थकलेले गृह कर्जाचे हप्ते व कर्जाची पूर्ण रक्कम मुदतवाढ देऊन भरण्यास तयार असताना देखील इंण्डोस्टार होम फायनान्स कंपनीकडून घरावर ताबा मारण्यासाठी मानसिक त्रास देऊन धमकाविण्यात येत असल्याने कर्जदार विनोद विलास देठे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पठाणी वसुली थांबविण्याची मागणी केली. घराचा ताबा घेतल्यास संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
विनोद विलास देठे यांनी इंण्डोस्टार होम फायनान्स कंपनीकडून ऑगस्ट 2018 मध्ये गृह कर्ज घेतले होते. सुरुवातीला हप्ता 14 हजार 300 रुपयांचा होता. परंतु त्यानंतर 2019-20 साली असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे कर्जाचा हप्ता देण्यास अडचण निर्माण झाली, तरी थोडेफार हप्ते भरले. त्यानंतर आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने कर्जाचे पूर्ण हफ्ते भरता आले नाही. कंपनीने थकित सहा हप्ते सहा पुढे ढकलले व त्याची एकूण रक्कम नंतर कर्जामध्ये समाविष्ट केल्यामुळे पंधरा हजार रुपयांचा मासिक हप्ता झाला.
कोरोनानंतरही काम धंदा नसल्याने हप्ते भरायचे राहून गेले. सदर फायनान्स कंपनीने नोटीस पाठवून कोट्यावधीचे कर्ज असल्याने नमुद केले. याप्रकरणी फायनान्स कंपनीत विचारणा केली असता, नजर चुकीने सदर नोटीस आल्याचे सांगण्यात आले. अशा नोटीसमुळे सदर कंपनीने मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. काही काळाने तालुका दंडाधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत 18 ऑगस्ट रोजी राहत्या घरी नोटीस लावून गेले. या नोटीसबद्दल फायनान्स कंपनीच्या कार्यालयात लहान भाऊसह गेलो असता, फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने अपमानित करुन हाकलून दिले. तर याप्रकरणी या कंपनीचे नाशिक व पुणे येथील अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी देखील उडवाउडवीचे उत्तरे दिले असल्याचे देठे यांनी निवेदनात म्हंटले आहे.
कर्जाची थकित रक्कम 2 लाख 42 हजार 136 रुपये इतकी आहे. तर त्यापैकी 1 लाख रुपये इतकी रक्कम त्वरित भरण्यास तयार असून, बाकी रक्कम दोन महिन्यात भरण्याची मुदतवाढ मागितल्यानंतरही फायनान्स कंपनीचे अधिकारी सहकार्य करण्याच्या मनस्थितीत नसून, त्यांना घराचा ताबा घ्यायचा प्रयत्न सुरु आहे. पोलीस व काही गुंडांच्या मदतीने घर खाली करुन घेण्यासाठी फायनान्स कंपनीचे अधिकारी धमकावत असल्याचा आरोप कर्जदार देठे यांनी केला आहे.
