जातीय द्वेषातून खासगी जागेत गटारीचे पाणी सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील खानापूर (ता. शेवगाव) ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याने भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी आपल्या कुटुंबीयांसह शेवगाव तहसिलदार यांच्या कार्यालयापुढे सोमवारी (दि.14 ऑगस्ट) उपोषण केले. तर खासगी प्लॉट मध्ये जातीय द्वेषातून ग्रामसेवक व सरपंच यांनी गावातील गटारीचे पाणी सोडल्याचा आरोप करुन त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदर रस्ता खुला केला जात नसल्याने गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे चक्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. गायकवाड यांचा खानापूर गावात 139 व 140 नंबरचा प्लॉट आहे. या प्लॉट मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर चर खोदून व काटे टाकून रस्ता बंद करण्यात आल्याने गायकवाड यांना स्वत:च्या जागेत जाता येत नाही. हा रस्ता अतिक्रमण करुन बंद करणाऱ्यांनी चोरला असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. तर जातीय द्वेषातून ग्रामसेवक व सरपंच यांनी सदरील प्लॉटमध्ये गावाच्या गटारीचे घाण पाणी सोडल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर रस्ता अडविणाऱ्यांवर कारवाई करावी व खासगी प्लॉटमध्ये गटारीचे घाण पाणी सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा गायकवाड कुटुंबीयांच्या वतीने घेण्यात आला आहे.