रस्ते दुरुस्ती करुन नागरी सुविधा पुरविण्याची जीवनधारा प्रतिष्ठानची मागणी
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आंदोलनाच्या तयारीत
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या रस्त्यांवरील खड्डयांचा प्रश्न बिकट असताना, नागापूर, बोल्हेगाव उपनगरातील नागरिक देखील खड्डेमय रस्त्यांनी वैतागले आहे. ऐन दिवाळीच्या सणासुदीला घरांसमोर साचलेले डबके, खड्डेमय रस्त्यांमुळे होणारे अपघात व रस्त्यालगतच्या उघड्या गटारी व ड्रेनेजमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, यावर त्वरीत उपाययोजना करुन नागरी सुविधा पुरविण्याची मागणी जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नागापूर, बोल्हेगाव येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. ठीक-ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्यालगतच्या उघड्या गटारी व नादुरुस्त चेंबर यात पावसामुळे पाणी साचलेले असून, नागरिकांना दुर्गंधी आणि साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना रस्त्यावर खड्डयात पाणी साचल्याने अंदाज येत नसल्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहे.

तर खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक पाठ दुखी, कंबरदुखीने वैतागले आहे. महिला व विद्यार्थ्यांना रस्त्यावर जाताना मोठ्या हालअपेष्टा सोसाव्या लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
काकासाहेब म्हस्के रोड, बोल्हेगाव फाटा ते बोल्हेगाव गावठाण रोड, आंबेडकर चौक ते गणेश चौक व नागपूर, बोल्हेगाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची त्वरीत पहाणी करावी, या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निर्णय घेऊन नागरी सुविधा पुरविण्याची मागणी जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन महापौर रोहिणीताई शेंडगे, स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांना देखील देण्यात आले आहे.
महापालिका प्रशासन खड्डेमय रस्त्यांवर वारंवार खडी व मुरुम टाकत असल्याने रस्त्यांची उंची वाढली असून, त्यालगत असलेली घरे खाली खड्डयात गेली आहे. यामुळे पाऊस झाल्यास नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. तर काही दिवसांनी मुरुमाची माती होऊन परिसर चिखलमय होत आहे. नागापूर, बोल्हेगाव येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास नागरिकांसह तीव्र आंदोलन केले जाणार आहे. -अमोल लगड (अध्यक्ष, जीवनधारा प्रतिष्ठान अध्यक्ष)