महापालिका प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी
नगरकरांचा जीव एवढा स्वस्त का? प्रश्न उपस्थित करुन आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला धरले धारेवर
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका प्रशासन नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप करुन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने दिवाळी-दसर्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी व मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने, महापालिका प्रशासन विरोधात संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या घोषणांनी महापालिका परिसर दणाणले. या आंदोलनात राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, साधनाताई बोरुडे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, जॉय लोखंडे, युवक शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, सुमित कुलकर्णी, अनंत गारदे, रंजना उकिर्डे, ऋषिकेश थाटे, सागर गुंजाळ, सिद्धार्थ आढाव, गणेश बोरुडे, रोहिणी अंकुश, सुरेखा बन, अब्दुल खोकर, शाहरुख शेख, शाहनवाज शेख, वसिम शेख, जाकिर तंबोळी, फिरोज पठाण, किरण आंधळे, अमोल कांडेकर, बाजीराव भिंगारदिवे, अर्जुन चव्हाण आदी सहभागी झाले होते.

या प्रश्नांबाबत उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे व उपायुक्त डॉ. श्रीनिवास कुर्हे यांच्याशी चर्चा करुन, चार दिवसात ठोस आश्वासन लेखी स्वरुपात न मिळाल्यास आनखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. कोणत्याही कामासाठी शहरात अनाधिकृतपणे सुरु असलेली रस्ते खोदाई, मोकाट कुत्र्याने एका बालकाचा जीव गेला, महापालिकेने जाग येण्यासाठी खड्डेमय रस्त्यावर देखील एखाद्याचा जीव जायची वाट पहावी का?, नगरकरांचा जीव एवढा स्वस्त का? हे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. तर महापालिकेत असलेल्या मोकाट कुत्र्यांचे छायाचित्र देखील उपायुक्तांना दाखविण्यात आल्याने ते अनुत्तरीत झाले. तसेच महापालिकेत आंदोलन झाल्यानंतर अनेकवेळा उत्तरे देण्यास सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. तर सदर मागणीचे स्मरणपत्र उपायुक्तांना देण्यात आले.

अहमदनगर शहरातील सर्वच रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून, शहरातील खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती सुधारली जात नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक खड्डेमय रस्त्यांमुळे पाठ दुखी, कंबरदुखीने वैतागले असून, शहरात दररोज लहान-मोठे अपघात घडत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने 21 सप्टेंबरला शहरातील रस्त्यांच्या कामाची पहाणी करुन नवरात्र उत्सवापूर्वी दिवाळी-दसर्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र महापालिका प्रशासनाने रस्त्यांची प्रत्यक्ष पहाणी केलेली नसून, शहरातील खड्डेमय रस्ते जैसे थे! परिस्थितीत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असून, महिला व विद्यार्थ्यांना रस्त्यावर जाताना मोठ्या हालअपेष्टा सोसाव्या लागत आहे. महापालिकेकडून खड्डेमय रस्त्यांबाबत मिळालेले लेखी उत्तर असमाधानकारक असून, दिवाळी-दसर्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेण्यात आली असल्याचे स्मरणपत्रात म्हंटले आहे.
तसेच मोकाट कुत्र्यांबाबत अनेकवेळा पाठपुरावा करुन देखील प्रशासनाला जाग आलेली नाही. एखाद्या लहान मुलाचा कुत्र्याने जीव घेतल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येते. नुकतेच नागापूर येथे कुत्र्याने चावा घेतल्याने त्या लहान बालकाला आपला जीव गमवावा लागला. विविध घटनांमध्ये मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने अद्याप पर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याला देखील महापालिका प्रशासन जबाबदार आहे. संपूर्ण शहर व उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचे टोळके असून, रात्री रस्त्याने जाणार्या नागरिकांच्या मागे मोकाट कुत्रे लागतात. महिला व लहान मुलांना घराबाहेर पडणे देखील धोक्याचे झाले आहे. शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांचा उपद्रवाचा बंदोबस्त करण्यासाठी त्वरीत कठोर पाऊले उचलण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
