बालकामगार व बालविवाह रोखण्याचे आवाहन
भविष्यातील धोके टाळण्यासाठी मुला-मुलींशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करा -जयंत ओव्हळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- पालकांचा मुला-मुलींशी संवाद कमी झाल्याने दुरावा निर्माण होत आहे. पालक देखील व्यस्त जीवनशैलीत मुलांकडे दुर्लक्ष करत असल्याने मुलांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचे प्रतिपादन बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओव्हळ यांनी केले. तर पालकांनी मुला-मुलींना मित्र, मैत्रिण बनवून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
जुने टिळक रोड येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात क्राय संस्थेच्या (मुंबई) वतीने भटके-विमुक्त, वंचित व दुर्बल समाज घटकांच्या समस्येवर आधारित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ओव्हळ बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बाल न्याय मंडळाच्या सदस्या अॅड. ममता नंदनवार, बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रमोद थोरात, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे अंबादास केदारे, नगर तालुका गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, क्राय संस्थेचे कन्सल्टंट राजेंद्र काळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुढे बोलताना ओव्हळ म्हणाले की, तरुण वयात मुला-मुलींचे नकळत पाय घसरतो. अशा वेळेला त्यांचे मित्र म्हणून पालकांना मार्गदर्शकाची भूमिका बजावता आली पाहिजे. यामुळे मुला-मुलींचे भविष्यात निर्माण होणारे धोके टाळता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात राजेंद्र काळे यांनी आदिवासी, पारधी समाजात बालविवाह, बालकामगारांचे प्रश्न गंभीर आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असले, तरी हा समाज व शासनामधील दुवा म्हणून क्राय संस्था कार्य करत आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या दुर्बल घटकांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. यासाठी शासन स्तरावर संस्थेच्या माध्यमातून त्यांना कागदपत्रांची पुर्तता करुन कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या घटकांना प्रवाहत आणण्यासाठी प्रामुख्याने गायरान जमीनीचा प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अॅड. ममता नंदनवार म्हणाल्या की, बालविवाह हा सर्वच समाजातील गंभीर प्रश्न बनला आहे. बालविवाहामुळे मुलींचे संसार उध्वस्त होत आहे. खेळण्याच्या वयात त्यांचे विवाह करून दिले जात असल्याने त्यांच्या आरोग्यासह इतर सामाजिक प्रश्न उद्भवत आहे. बालविवाह करून एक प्रकारे मुलीच्या जीवाशी खेळले जात आहे. देशात 28 टक्के बालविवाहाचे प्रमाण असून, जिल्ह्यात हे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे. अशिक्षितपणा व जागृती नसल्याने हा प्रकार घडत असून, बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी कशा पध्दतीने कर्तव्य बजवावे याबद्दल सांगितले.
गट शिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांनी घटनेने देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार दिला आहे. अशिक्षितपणामुळे काही दुर्बल घटक आपल्या हक्कापासून वंचित राहत आहे. यासाठी मुला-मुलींना शिक्षण देऊन प्रवाहात येण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांनी बालमजुरी ही एक अनिष्ट प्रथा बालकांच्या विकासावर बाधा आणणारी आहे. यामुळे त्या कुटुंबाचे भवितव्य धोक्यात येते. एक पालकत्व किंवा अनाथ बालके असणार्या कुटुंबामध्ये अधिक प्रमाणात बालमजूर असल्याचे आढळत आहे. मात्र शासनाने देखील या बालकांसाठी शिक्षणाच्या सुविधा निर्माण करुन त्यांच्या पालनपोषणाची देखील जबाबदारी घेतली आहे. या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
या चर्चासत्रात गायरान जमीनीचे प्रश्न, शाळाबाह्य मुले-मुली, बालविवाह प्रतिबंध कायदा व शिक्षण विभागाच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली. आदिवासी, पारधी समाजबांधवांचे विविध प्रश्न जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी प्रकाश कदम, सोमनाथ वाळके, नंदा साळवे, शशिकांत, शिरसाठ, कल्याणी साळुंके, चंद्रकांत काळे, दिगंबर शेलार, मंदा कांबळे, स्वाती काटे, स्वाती नेटके, लक्ष्मी पवार, गजानन काळे, आसाराम सातपुते, अजित भोसले, सुभाष शिंदे, ज्ञानदेव वाघ, सुवर्णा धावडे, प्रियंका जाधव, अशोक मोरे, मिथुन चव्हाण, रामसिंग भोसले, भाऊ पवार, अशोक मोरे, सुभाष शिंदे, शत्रुघन भोसले, धर्मेंद्र चव्हाण आदींसह आदिवासी, पारधी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
