राजकारण व समाजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रा. विधाते यांची ओळख -भरत गारुडकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार करण्यात आला. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, बाबासाहेब गारुडकर, तुषार टाक, सागर सोबले, हर्षल गारुडकर, कृष्णा गारुडकर, ओम गारुडकर, मनोज शिंदे, नाथा जाधव आदी उपस्थित होते.
केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर म्हणाले की, राजकारण व समाजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रा. विधाते यांची ओळख आहे. विविध क्षेत्रात त्यांचा उत्तम जनसंपर्क असून, राजकारणात राहून ते समाजकार्य करत आहे. युवा कार्यकर्त्यांना ते दिशा देण्याचे काम करतात. प्राध्यापक असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांनी शिस्त लावण्याचे काम केले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जवळ करून आमदार संग्राम जगताप यांची ताकद वाढविण्याचे काम ते सातत्याने करत आहे. एक मोठा सुशिक्षित वर्ग त्यांनी राष्ट्रवादीशी जोडून ठेवला आहे. बँकेत देखील आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून बँक प्रगतीपथावर घेऊन जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना प्रा. माणिक विधाते यांनी राजकारणात समाजकारणाच्या दृष्टीकोनाने कार्य करत आहे. अनेक चांगले कार्यकर्ते जोडण्याचे काम केले असून, सर्वांकडून प्रेम मिळत आहे. तर निस्वार्थ भावनेने देत असलेल्या योगदानाबद्दल विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.