भक्तीमय वातावरणात पाच दिवसीय कीर्तन महोत्सवाची सांगता
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील पाच गोडाऊन प्रांगणात पाच दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. यामध्ये वारकरी, ग्रामस्थ भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरणात तल्लीन झाले होते. या धार्मिक सोहळ्याला संपूर्ण केडगाव परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली.

मराठी नववर्षाची सुरुवात कीर्तन महोत्सवातून होण्याच्या उद्देशाने गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अमोल येवले यांच्या पुढाकाराने हा धार्मिक सोहळा घेण्यात आला. टाळ-मृदंगाचा गरज, टाळ्यांची साथ, पखवाजाचे बोल आणि विठोबा रखुमाई भजनात दंग झालेले भाविक, अशा भक्तीमय वातावरणात कीर्तन महोत्सवाची पर्वणी केडगावकरांनी अनुभवली. यामध्ये नामवंत कीर्तनकार अक्षय महाराज उगले (नेवासा), जयश्रीताई येवले (मावळ, पुणे), शिवलिलाताई पाटील (बार्शी, सोलापूर), कबीर महाराज अत्तार व व्याख्याते गणेश शिंदे यांचे कीर्तन झाले.

बार्शी झी टॉकीज फेम शिवलीलाताई यांनी कीर्तन सेवा दिली व नागरिकांचे प्रबोधन केले. जीवनात आयुष्य कसे जगावे व मुलींनी आपली हिंदू संस्कृती कशी जपावी? यावर मार्गदर्शन केले. महोत्सवाची सांगता व्याख्याते गणेश शिंदे यांनी केली. नगरसेवक अमोल येवले यांनी एकल महिलांच्या हस्ते विठू माऊली व छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करुन एक वेगळा पायंडा पाडला.
महाप्रसादाने कीर्तन महोत्सवाची सांगता झाली. या पाच दिवसीय किर्तन महोत्सवात तब्बल दहा हजार नागरिकांनी हजेरी लावल्याची माहिती नगरसेवक येवले यांनी दिली. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अमोल येवले मित्र परिवार, छत्रपती फाउंडेशन व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
