• Thu. Oct 16th, 2025

कुरान पूर्ण करणार्‍या 40 विद्यार्थ्यांचा गौरव

ByMirror

Nov 7, 2022

16 वर्षीय कुरान हाफिज झालेल्या मुलीला लॅपटॉपचे बक्षिस

अंजूमन ए तहफीजूल कुरआन मदरसेचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील मस्जिद ए अक्स्प संचलित अंजूमन ए तहफीजूल कुरआन मदरसा येथील कुरान पुर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तर 16 वर्षीय कुरान हाफिज म्हणजेच कुरान तोंड पाठ करणारी मुलगी वजिफा परवेज महागामी हिला लॅपटॉपचे बक्षिस देण्यात आले.


मदरसा अंजूमन ए तहफीजूल कुरआनच्या वतीने मुकुंदनगर भागातील विद्यार्थ्यांना ईस्लाम धर्माचे शिक्षण दिले जाते. या मदरसा मध्ये 342 विद्यार्थी व विद्यार्थिनी धार्मिक शिक्षण घेत आहेत. शालेय शिक्षणाबरोबर या विद्यार्थ्यांचे धार्मिक शिक्षण सुरु आहे. नुकतेच 40 विद्यार्थ्यांनी कुरान पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अक्कलकुवा येथील मौलाना इफ्तेकार कासमी, मौलाना मुर्शिद कासमी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आली. यावेळी मदरसेचे मौलाना इत्तेहाज, मुक्ती अल्ताफ, कारी जाबीर, मौलाना अख्तर कासमी, मौलाना रऊफ आदींसह परिसरातील नागरिक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


प्रास्ताविकात हाफिज जैद म्हणाले की, धार्मिक शिक्षण नसल्याने उच्च शिक्षित होऊन देखील भावी पिढी भरकटत चालली आहे. चंगळवादी संस्कृतीला धार्मिक शिक्षणाने रोखता येणार आहे. कुरान मनुष्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. यासाठी कुरानचे ज्ञान देऊन त्याचे महत्त्व नवीन पिढीला समजविण्यासाठी मदरसा योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.


मौलाना इफ्तेकार कासमी व मौलाना मुर्शिद यांनी जीवनात कुरानचे महत्त्व सांगून चांगले मनुष्य व समाज घडविण्यासाठी धार्मिक शिक्षणाची जोड आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देणार्‍या मौलानांचा सत्कार करण्यात आला. लॅपटॉप व इतर बक्षिसांसाठी तन्जीमे इमारते शरीया व मल्टीपर्पज फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले. सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *