कर्मचार्यांच्या न्याय, हक्कासाठी शासन व कर्मचारी यांमधील दुवा म्हणून कास्ट्राईबचे कार्य -वसंतराव थोरात
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी वसंतराव थोरात यांची नियुक्ती झाल्याबद्दल अहमदनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात चेअरमन सतीश साठे व व्हाईस चेअरमन गुलाबराव गाडे यांनी माजी संचालक असलेले थोरात यांचा सत्कार केला. यावेळी जेष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाळासाहेब गंगेकर, किशोर कानडे, बलराज गायकवाड, सोमनाथ सोनवणे, विकास गीते, कैलास चावरे, शेखर देशपांडे, संचालिका उषा वैराळ, प्रमिला पवार, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी, विठ्ठल बुचकूल आदी उपस्थित होते.
चेअरमन सतीश साठे म्हणाले की, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कर्मचारी हितसाठी सुरु असलेले राज्यव्यापी कार्य कौतुकास्पद आहे. या राज्य पातळीवरील संघटनेत आपल्या संस्थेतील घटक राहिलेले थोरात यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड होणे, सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे सांगून त्यांनी थोरात यांना कामगार हिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वसंतराव थोरात म्हणाले की, शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांच्या न्याय हक्कासाठी कास्ट्राईब संघटना सतत प्रयत्नशील आहे. संघटनेच्या माध्यमातून कर्मचार्यांचे अनेक न्याय हक्काच्या मागण्या सोडविण्यात आल्या आहेत. शासन स्तरावरील कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरु आहे. कर्मचार्यांच्या न्याय, हक्कासाठी शासन व कर्मचारी यांमधील दुवा म्हणून कास्ट्राईब राज्यभर कार्य करत असून, महापालिका कर्मचार्यांच्या विविध न्याय-हक्काच्या प्रश्नासाठी कास्ट्राईबचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.