कास्ट्राईबचे नेहमीच कर्मचारी वर्गाच्या कल्याणासाठी योगदान -एन.एम. पवळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रशेखर साहेबराव वांढेकर यांची नियुक्ती करण्यात आली. कास्ट्राईबचे राज्य अध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्य महासचिव सुहास धीवर यांनी वांढेकर यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, सहसचिव श्यामभाऊ थोरात, समीर वाघमारे, सुदाम जाधव आदी उपस्थित होते.
राज्य अध्यक्ष एन.एम. पवळे म्हणाले की, शासकीय, निमशासकीय कर्मचारी हितासाठी कास्ट्राईब महासंघ कार्य करत आहे. कास्ट्राईबचे नेहमीच कर्मचारी वर्गाच्या कल्याणासाठी योगदान देत आहे. कर्मचार्यांचे शासन स्तरावर असलेले प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी कास्ट्राईबचा सातत्याने प्रयत्न राहिला असून, विविध प्रश्नावर व न्याय-हक्कासाठी आवाज उठविण्याचे काम केले आहे. यासाठी संघटेनेचे महाराष्ट्रभर उत्तमप्रकारे संघटन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य महासचिव सुहास धीवर म्हणाले की, कर्मचार्यांच्या न्याय हक्कासाठी कास्ट्राईब संघटनेचे कार्य सुरु आहे. शासन स्तरावर प्रश्न न सुटल्यास वेळप्रसंगी कायदेशीर लढा देऊन कर्मचार्यांना न्याय देण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना चंद्रशेखर वांढेकर यांनी कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊन, संघटनेच्या ध्येय-धोरणानुसार काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.