दिल्ली येथील युनिव्हर्सल मेंटॉर्स असोसिएशनने पुरस्काराने गौरविल्याबद्दल सत्कार
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून कटिबध्द -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल मेंटॉर्स असोसिएशन (नवी दिल्ली) यांच्याकडून देण्यात येणारा उत्कृष्ट शैक्षणिक संस्थाचालक पुरस्कार शहरातील शिशु संगोपन संस्थेचे सचिव रतिलाल कासवा व उत्कृष्ट मुख्याध्यापिका पुरस्कार सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील मुख्याध्यापिका योगिता गांधी यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
सविता रमेश फिरोदिया शाळेत झालेल्या कार्यक्रमात शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी दोन्ही पुरस्कार्थींचा सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे शहराध्यक्ष ज्ञानदेव बेरड, विनोद कटारिया, श्रीराम खाडे, भाऊराव डोळस, निलेश आंबेकर, अनिता बेरड, मनीषा पालवे, प्रतिभा गर्जे, रोहिणी कुलट, निर्मला जगताप, वर्षा गोरे, नीता लांडगे आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, शाळांमधून सक्षम पिढी घडविण्याचे कार्य होत आहे. मात्र समाज घडविणार्या या वर्गाच्या कार्यादी देखील दखल घेण्याची गरज आहे. या संस्थेत उत्कृष्ट शिक्षकांच्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता देखील वाढली आहे.
सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहे. या शाळेत सर्वसामान्य वर्गातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचे सांगून, शाळेत सुरु असलेल्या उत्कृष्ट कार्याचे त्यांनी कौतुक केले. तर शिक्षकांच्या अडीअडचणी व विविध प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानदेव बेरड यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कौतुक केले. या गुणवत्तेमुळे नुकतेच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 32 विद्यार्थी पात्र झाल्याबद्दल मुख्याध्यापकासह सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करुन, योग्य व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान झाल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शौकत शेख यांनी केले. आभार मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी मानले.