अहमदनगर शोतोकान कराटे प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षण वर्गाला युवक-युवतींचा प्रतिसाद
स्वसंरक्षणासाठी कराटेसह तायक्वांदो, लाठी-काठी व शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शोतोकान कराटे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने झालेल्या प्रशिक्षण वर्गातील युवक-युवतींनी बेल्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. वर्ल्ड ट्रेडीशनल शोतोकाम कराटे फेडरेशन ऑफ इंडिया संचलित प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गाला युवक-युवतींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खडतर प्रशिक्षणानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचा हा सन्मान सोहळा पार पडला. संस्थेच्या वतीने युवक-युवतींनी स्वसंरक्षणासाठी कराटेसह लाठी-काठी, तायक्वांदो व शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले.
कामरगाव (ता. नगर) येथील कराटे प्रशिक्षण केंद्रात कराटेच्या परीक्षेत यश संपादन करणार्या युवक-युवतींना नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी हेमंत साठे, अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे खजिनदार तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, कुंडलिक कचाले, लहू जायभाय, हर्षद वारे, कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे, कैलास जाधव, प्रकाश ठाणगे, प्रविण जाधव, अर्चना जाधव, मुख्य प्रशिक्षक सुरेश जाधव, सरफराज सय्यद आदींसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामदास भोर म्हणाले की, कराटे खेळातून युवकांचे शरीर व मन सदृढ होणार आहे. मानसिक व शारिरीक स्वास्थ्याचे प्रश्न युवकांमध्ये उद्भवत असून, मैदानी खेळातून निर्माण झालेला व्यक्ती जीवनातील सर्व संकटांना सामोरे जाऊन यश मिळवतो. कराटे व इतर मर्दानी खेळ स्वसंरक्षणासाठी सर्वोत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी व्यायाम हा महत्त्वाचा घटक आहे. कराटे खेळातून शारीरिक व्यायाम होऊन स्वसंरक्षणाचे धडे देखील मिळतात. आजच्या काळात मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे व मर्दानी खेळ उपयुक्त ठरत आहे. तर शिक्षण व नोकरीत देखील खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षक सुरेश जाधव यांनी कराटे या खेळातून शारीरिक व्यायाम, मनाची एकाग्रता व स्वसंरक्षणाचे धडे मिळत असतात. या खेळाला ऑलिम्पिकची देखील मान्यता असून, या खेळात अनेक खेळाडू गुणवत्ता सिध्द करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खेळाडूंनी कराटे व शिवकालीन विविध मर्दानी खेळाचे विविध धाडसी चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थित पालकांनी मुलांच्या कलागुणांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.