• Fri. Sep 19th, 2025

कर्जत बाजार समितीमधील फेर मतमोजणीचा जिल्हा उपनिबंधकांचा निकाल कायम

ByMirror

May 21, 2023

नाशिक विभागीय सहनिबंधकांचा आदेश

सोमवारी होणार मतमोजणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी संदर्भात नाशिक विभागीय सहनिबंधक यांनी जिल्हा उपनिबंधक यांचा फेर मतमोजणीचा निकाल कायम ठेवला असून, सोमवारी (दि.22 मे) फेर मतमोजणी होणार आहे.


कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत सन 2023 ते 2028 या कालावधी करिता मतदान होऊन 29 एप्रिल रोजी मतमोजणी झाली होती. त्या संदर्भात लीलावती बळवंत जामदार व भरत संभाजी पावणे यांचा फेर मतमोजणीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामंजूर केल्याने त्यांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे अपील दाखल केले होते. 22 मे रोजी फेरमतमोजणी करण्याबाबत आदेश केला होता. या आदेशाविरुद्ध गुलाब रामचंद्र तनपुरे, संग्राम रावसाहेब पाटील व सुवर्णा सतीश कळसकर यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील दाखल केले. सदरची 19 मे रोजी सुनावणी झाली. त्यामध्ये मूळ हरकतदार यांच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांनी अर्जदाराच्या अपिला मधील स्थगिती अर्ज नामंजूर केल्याने. जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जतची 22 मे रोजी फेरमतमोजणी होणार आहे.

मूळ हरकतदार लीलावती बळवंत जामदार व भारत संभाजी पावणे यांच्या वतीने अ‍ॅड. बी.सी. शेळके, अ‍ॅड. गजेंद्र पिसाळ, अ‍ॅड. अच्युत भिसे, अ‍ॅड. विशाल पांडुळे, व अ‍ॅड. निखिल चव्हाण यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *