अंबादास दूध संकलन केंद्राच्या वतीने दिवाळी बोनसचे वाटप
निमगाव वाघा येथील दूध उत्पादक शेतकर्यांची दिवाळी होणार गोड
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगांव वाघा (ता.नगर) येथील अंबादास दूध संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादक शेतकर्यांना बोनसची भेट देण्यात आली. या बोनसमुळे मिळाल्याने दूध उत्पादक शेतकर्यांची दिवाळी गोड होणार आहे. गावातील दूध उत्पादक शेतकर्यांना एक रुपयाप्रमाणे अडीच लाख रुपयाचे बोनस वाटप करण्यात आले.
दूध संकलन केंद्राच्या चेअरमन भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते दूध उत्पादक सभासदांना बोनसचे वाटप करण्यात आले. पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषदेचा आदर्श गो पालक पुरस्कार प्राप्त पै. नाना डोंगरे यांना प्रथम बोनस देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नवनाथ जाधव, शिवाजी जाधव, अजय फलके, भाऊसाहेब ठाणगे, संतोष खांडवे, राजू शिंदे, बाळू जाधव, विजय भगत, बापू सुंबे, उत्तम निमसे, भाऊ होळकर, महादेव पाचरणे आदींसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात भाऊसाहेब जाधव यांनी दूध संकलन केंद्राची माहिती देवून, दूधाच्या गुणवत्तेबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन केले. दूध गुणवत्तेसाठी अंबादास दूध संकलन केंद्र अग्रेसर असून, दूध संकलीत करुन शेतकर्यांना चांगला भाव देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे यांनी अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून, दुग्ध व्यवसायाने शेतकर्यांना मोठा आधार मिळाला आहे. दूधाचा जोडधंदा शेतकर्यांना काळाची गरज बनला असल्याचे स्पष्ट केले. तर अतिवृष्टीने शेतकर्यांचे नुकसान होऊन ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना, शेतकर्यांना बोनस मिळाल्याने दिवाळी गोड होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.