गायकवाड दांपत्यांचे मुळाबाळांसह पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण
पोलीस निरीक्षक पतीवर हद्दपारीची कारवाई करण्याची धमकी देत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी हद्दीत मोठ्या प्रमाणात फोफावलेले अवैध धंदे, जुगार व अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्ष शारदा गायकवाड व अंतोन गायकवाड या दांपत्यांनी आपल्या कुटुंबीयांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण केले.
या भागातील तब्बल 20 अवैध धंद्यांचा लेखाजोखा नाव, पत्त्यासह देऊन देखील कारवाई होत नसल्याने अवैध धंदे वाल्यांना पोलीस प्रशासन पाठिशी घालत आहे. तर अवैध धंदे विरोधात उपोषण केल्याचा इशारा दिल्याने स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पतीवर हद्दपारीची कारवाई करण्याची धमकी देत असल्याचा आरोप शारदा गायकवाड यांनी केला आहे.
नागापूर, एमआयडीसी, नवनागापूर परिसरात मोठ्या प्रमाणात मटका, दारू, बिंगो, सोरट जुगार, अवैध धंदे, दारू विक्री खुलेआम सुरू आहे. के.के. रेंज भागात अवैध वाळू तस्करी खुलेआम सुरु आहे. मात्र स्थानिक पोलीस अधिकारी या अवैध धंद्यावाल्यांकडून हप्ते घेऊन त्यांना अभय देत आहे. यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या अवैध धंद्यामुळे गोरगरीब लोकांचे संसार उध्वस्त होत आहे. तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहे. पुरुष व्यसनी व जुगारी झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपसमारीची वेळ आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर हा तक्रार अर्ज देऊन उपोषण करत असल्याने स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पती अंतोन गायकवाड याला हद्दपारीची कारवाई करण्यासाठी धमकावत आहे. तर अवैध धंद्यावाल्यांकडूनही त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.