संसदीय लोकशाही खर्या अर्थाने राबविण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार
लोकभज्ञाकांसाठी मतफत्ते आणि सत्तापेंढार्यांविरुद्ध डिच्चूफत्ते या तंत्राचा वापर करण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- मतसत्ताक संसदीय लोकशाही खर्या अर्थाने राबविण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने एक चतुर बिरबल, शंभर कोटी चतुर मतदार बिरबल! मोहीम जारी करण्यात आली असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे महासचिव अशोक सब्बन यांनी दिली.
भारतीय संविधान अमलात आल्यानंतर 73 वर्षे मतदारांनी मोठ्या प्रमाणातून उन्नत चेतना लक्ष्मण रेषा ओलांडल्यामुळे गुट्टलबाज सत्तापेंढार्यांनी मतदारांना जात, धर्म, पैसा, कोंबडीच्या आहारी नेवून मागच्या दाराने सत्ता मिळवली. त्यामुळेच अशा सत्तापेंढारींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारला. याचा परिणाम देशात सगळीकडे दारिद्रय, बेकारी, झोपडपट्ट्या, भ्रष्टाचार, टोळवाटोळवी अनागोंदी टोकाला पोहोचली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
मतदार छोट्या फायद्यासाठी सत्ता पेंढारी यांच्या आहारी जातात. यातून देश आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्टया पोखरला गेला आहे. या मोहीमद्वारे जनता, मतदार लोकभज्ञाकांसाठी मतफत्ते तर सत्तापेंढारी विरोधात डिच्चूफत्ते राबविल्याशिवाय राहणार नाही. देशातील भ्रष्टाचाराचे मुळ हे मतदान सत्तापेंढारी मत विकत घेण्यात आहे. ही वाईट प्रवृत्ती रोखण्यासाठी संपूर्ण देशात किमान समान देशसेवेच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराला चतुर बिरबलचा दर्जा देण्याचा निर्णय करण्यात आला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदारांच्या आत्मसन्मानामुळे देशात आर्थिक, सामाजिक, राजकीय क्रांती नक्कीच घडविता येणार आहे. शंभर कोटी मतदारांच्या मनात आत्मन्यायालय कार्यान्वीत व्हावे आणि त्यांनी आत्मआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा हा संघटनांचा प्रयत्न या मोहिमेद्वारे केला जाणार आहे. मतदारांच्या गाफिलपणामुळे उन्नत चेतनेची दिवाळखोरी केली जाते आणि तमस चेतनेच्या लोकांना सत्ता दिली जाते. यासाठी प्रत्येक मतदाराने उन्नत चेतना लक्ष्मण रेषा कोणत्याही परिस्थितीत ओलांडायची नाही आणि लोकभज्ञाकांसाठी मतफत्ते आणि सत्तापेंढार्यांविरुद्ध डिच्चूफत्ते या तंत्राचा वापर घराघरात नेण्यात येणार असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, महेबूब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम, तुकाराम बोरगे, बाबा आरगडे आदी प्रयत्नशील आहेत.