सहाय्यक कामगार आयुक्तांच्या लेखी आश्वासनाने सैनिक समाज पार्टीचे उपोषण मागे
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत बेकायदेशीरपणे माथाडी मंडळाच्या नावाने छपाई केलेल्या बनावट वाराई पावती पुस्तकाचे बेकादेशीरपणे वापर करून झालेल्या फसवणूक प्रकरणाच्या चौकशीसाठी 24 तासात अहवाल मागविण्याचे सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी कंपनी व्यवस्थापन, माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे सचिव व संबंधित अधिकार्यांना लेखी आदेश काढल्याने सैनिक समाज पार्टीने आपले उपोषण मागे घेतले. तर उपोषणकर्त्यांना कायनेटीक कंपनी अस्थापनेच्या निरीक्षणाबाबत व मध्यान्ह भोजनाबाबत आवश्यक कागदपत्र उपलब्ध करण्याचे लेखी आश्वासन कवले यांनी दिले. यावेळी सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, किरण शिंदे, रवि वाकळे, दत्ता वामन, तुकाराम डफळ, सर्जेराव आठवले, अनिल कुर्हाडे, अनुराग पडोळे, सचिन वनवे, सविता, नरवडे, अनिता वेताळ, दीपक वर्मा, दत्तात्रेय कोतकर, शाहिर कान्हू सुंबे आदी उपस्थित होते.
माथाडी कामगार कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या पैश्याचे अपहाराची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे, कायनेटिक इंजिनिअरींग कंपनीकडून होत असलेल्या कामगार कायद्याचे उल्लंघन आणि कामगारांच्या शोषणप्रश्नी न्याय मिळण्याच्या मागणीसाठी सैनिक समाज पार्टीच्या वतीने बालिकाश्रम रोड येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले होते.
तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यकाळात माथाडी कामगार व असंरक्षित कामगार मंडळामध्ये बेकायदेशीरपणे वाराई पावती पुस्तक छापून कामगारांच्या पैश्याचा अपहार झाला आहे. दोन्ही टोळीप्रमुखांवर कारवाई करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून 26 मार्च 2018 कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला. याबाबत गुन्हे दाखल होण्यासाठी पोलीसांकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र राजकीय दबावामुळे पोलीसांशी संगनमत करुन जाणूनबुजून कागदपत्रात त्रूटी ठेऊन गुन्हा दाखल होत नसल्याचा सैनिक समाज पार्टीने आरोप केला आहे.
कायनेटीक कंपनीच्या प्रदूषणाबाबत, मध्यान भोजन, औद्योगिक सुरक्षा व आरोग्यसंबंधी प्रश्न व कंपनीचे बेकायदेशीरपणे झालेल्या निरीक्षणाची तक्रार उपोषणकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन दोषी अधिकारी, कर्मचारी व कंपनी व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीने केलेली आहे.
