रिपाईचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपुलाच्या राहिलेल्या पिल्लरवर इतर महापुरुषांच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांचे प्रतिमा रेखाटण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सालीमठ यांची भेट घेऊन सदर मागणी केली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुकाध्यक्ष राजू उबाळे, राहता युवक तालुकाध्यक्ष करण कोळगे, नगर तालुका युवक सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, युवक जिल्हा कार्याध्यक्ष बंटी गायकवाड, नगर तालुका उपाध्यक्ष जयराम आंग्रे आदी उपस्थित होते.
नगर शहरातील उड्डाण पुलाच्या पिल्लरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर रेखाटण्यात आलेले चित्र स्वागतार्ह व कौतुकास्पद आहे. शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक क्षणांचे प्रतिमा रेखाटल्याने सर्वसामान्यांना त्यांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. या पुलाचे काही पिल्लर मोकळे असून, अशा पिल्लरवर समाजातील महापुरुष असलेले क्रांतीसुर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आदींच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांचे प्रतिमा रेखाटल्यास सर्व महापुरुषांचा इतिहास बहुजन समाजापुढे उभा राहणार असल्याचे रिपाईच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज बहुजन समाजाचे आराध्य दैवत असून, त्यांच्यासह इतर महापुरुषांचे चित्र रेखाटल्याने सामाजिक एकतेचा संदेश जाणार आहे. तर या महापुरुषांच्या इतिहासाला उजाळा मिळून सर्वांना प्रेरणा मिळणार असल्याचे म्हंटले आहे.