वेतनवाढ व मानधनासाठी संघर्षाची घोषणा
ग्रामीण भागातील महिलांना विकासाच्या प्रवाहात आणणार्या सीआरपी महिलांच दुर्लक्षीत -अॅड. कॉ. सुधीर टोकेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात उमेद अभियानातील समुदाय संसधन व्यक्तींच्या (सीआरपी) मानधन व इतर प्रश्नांवर बैठक पार पाडली. या बैठकीत आयटकच्या मार्गदर्शनाखाली उमेद सिआरपी संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सीआरपी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन नवीन संघटनेची घोषणा करण्यात आली. आयटकचे राज्य उपाध्यक्ष अॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीप्रसंगी विडी कामगार संघटनेच्या उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, मनीषा मोहोळकर, अलका कदम, सुनिता उंडे, प्रतिभा उंडे, मीरा गायकवाड, सुलोचना हापसे, विजया पातकळ, कोमल मुठे, मीनाताई खैरे, सारिका जाधव, शैला भांबरे, मंगला आंधळे आदी उपस्थित होत्या.
अॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला आर्थिक संपन्न करण्यासाठी समुदाय संसधन व्यक्तींचा महत्त्वाचा भाग आहे. उमेद अंतर्गत मोठ्या संख्येने बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले जात आहे. मात्र हे कार्य करणार्या महिलांचे प्रश्न दुर्लक्षीत राहिले आहे. त्यांनी केलेल्या विविध सर्व्हेक्षणाचे 2019 पासून कोणतेही मानधन देण्यात आलेले नाही. अल्प वेतनात त्यांचा उदरनिर्वाह सुरु असून, त्यांना सन्मानाने जगण्यासाठी वेतनवाढ, मानधन व इतर प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनीषा मोहोळकर म्हणाल्या की, सीआरपी महिलांना बचत करायला शिकवतात. विधवा, परितक्त्या व एकल महिलांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शासनाचे कल्याणकारी योजना महिलांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत. अल्पवेतनामध्ये त्या काम करत असून, त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत समुदाय संसधन व्यक्तींना संविधानिक पद निर्माण करावे, मनाधनाऐवजी पगार मिळावा, केलेल्या सर्व्हेक्षणाचे मानधन मिळावे आदी विविध प्रश्न शासनस्तरावर संघटनेच्या माध्यमातून मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.