जिल्ह्यातील पदाधिकार्यांची आढावा बैठकीत निर्धार, गावोगावी बुथ उभारण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना
सत्तापिपासू पक्षांना जनता वैतागली -अजित फाटके
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रातील व राज्यातील सत्तापिपासू पक्षांना जनता वैतागली असून, त्यांच्या कृत्यामुळे लोकशाहीचा कणा मोडण्याचे कारस्थान सुरु आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी त्यांना सत्तेत वाटा नाहीतर, ईडीने काटा काढण्याचे काम केले जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य संघटन सचिव अजित फाटके यांनी केला. तर जनतेचे प्रश्न सोडून सत्तापिपासू बनलेल्यां विरोधात भविष्यातील सर्व निवडणुका आप सक्षमपणे लढविणार असल्याचे स्पष्ट केले.

आम आदमी पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना फाटके बोलत होते. याप्रसंगी शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, कार्याध्यक्ष भरत खाकाळ, शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, प्रकाश फराटे, संपत मोरे, काकासाहेब खेसे, अॅड. विद्या शिंदे, गणेश मारवाडे, महेश घावटे, क्षीरसागर कॉन्ट्रॅक्टर, राजू आघाव, प्रवीण तिरोडकर, दिलीप घुले, शरद शिंदे, दादासाहेब बोडखे, राजेंद्र नागवडे, संतोष नवलखा, बजरंग सरडे, रवी सातपुते, हरीभाऊ तुवर, बेल्हेकर काका, गौतम कुलकर्णी, सुधीर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुढे फाटके म्हणाले की, सत्तेसाठी कोणत्याही थरावर जाणारे पुढार्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे. आपने सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू ठेवून राजकारण केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कोणतीही तडजोड केली नाही. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली वीज, पाणी, आरोग्य व उच्च दर्जाचे शिक्षण मोफत दिले जात आहे. त्याचप्रकारे महाराष्ट्रात सर्वसामान्यांना सेवा देऊन आप सक्षम पर्याय म्हणून पुढे आला आहे. पक्षाचे ध्येय-धोरण समोर ठेऊन पक्ष महाराष्ट्रात वाटचाल करत असताना कार्यकर्त्यांनी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून कामाला लागण्याचे त्यांनी आवाहन केले. दिल्ली, पंजाब, गुजरात नंतर आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात पूर्ण लक्ष केंद्रित केले असून, राज्य सहप्रभारी गोपाळभाई इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीच्या फेरबदलाचे संकेत त्यांनी दिले.
या बैठकित जिल्ह्यातील गावागावात बुथ लेवल उभारण्यापासून पक्ष मजबूत करणे व निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या पदाधिकार्यांना सूचना देण्यात आल्या.