एकमेकांच्या कठिण काळात धावणे हीच खरी माणुसकी -आ. लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कोरोना काळात अनेकांचे जीव वाचविणारे व सर्वसामान्यांना आधार देणारे आमदार निलेश लंके यांना राज्यस्तरीय शौर्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शहरातील संपर्क कार्यालयात आमदार लंके यांना वाचनालयाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आदित्य गोरे, उद्योजक कशोर बोडखे, आमदार लंके यांचे स्वियसहाय्यक शिवा कराळे, रामदास अडागळे, प्रमोद मोहिते, सचिन कराळे, अविनाश साठे आदी उपस्थित होते.
आमदार निलेश लंके यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, सामाजिक कामातून माणसाची एक वेगळी ओळख निर्माण होते. केलेल्या कामाची व त्यागाची सर्वसामान्य जनता दखल घेत असते. एकमेकांच्या कठिण काळात धावणे हीच खरी माणुसकी असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, कोरोनाकाळात कोविड सेंटर उभारुन आमदार लंके यांनी गोर-गरीबांना आधार दिले. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून सर्वसामान्य जनतेने त्यांना लोकनेता म्हणून संबोधले. राजकारणापेक्षा सर्वसामान्यांचे हित पाहून लंके यांनी उभे केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.