महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची बदनामी करणारे मजकूर व्हायरल केल्याचा आरोप
कोतवालीच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्य हनन करणारे बदनामकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करणार्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप शहर महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली.
महिलांच्या शिष्टमंडळाने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. तर महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याच्या कृत्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी महिला मोर्चाच्या सरचिटणीस प्रिया जानवे, महिला आघाडी उपाध्यक्षा ज्योती दांडगे, उपाध्यक्ष कालिंदी केसकर, मंडळ अध्यक्ष सविता कोटा, कार्यकारणी सदस्य प्रतिभा पेंडसे, रेखा मैड, लीला अग्रवाल, गीता गिल्डा, हेमलता कांबळे, कुसुम शेलार आदी महिला उपस्थित होत्या.
भाजप महिला मोर्चाच्या प्रतिनिधी समाजात महिला सबलीकरण व सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे. जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होतो, तिथे आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम केले जाते. मात्र भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रकार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला असल्याचा आरोप महिलांच्या शिष्टमंडळाने केला आहे.
आव्हाड यांनी 9 जून रोजी चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामीकारक मजकूर ट्विटरवर अपलोड केला आहे. वाघ यांची बदनामी, मानहानी, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा व सामाजिक जीवनातून उठविण्याचे काम या कृत्याद्वारे करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांचे चरित्र्य हनन केले जात असून, हा प्रकार भाजप महिला मोर्चाच्या वतीने सहन केला जाणार नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.