बोथरा परिवाराच्या वतीने हॉस्पिटलला डिजीटल एक्स रे मशीन, ज्येष्ठ रुग्णांसाठी बस व बालरोग विभागास आर्थिक मदत
दीनदुबळ्यांचे आश्रू पुसण्याचे कार्य करुन, त्यांच्या सेवेसाठी पारस ग्रुप वचनबद्ध -प्रेमभाऊ बोथरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त बोथरा परिवार संचलित पारस उद्योग समुहाच्या वतीने स्व. जतनबाई माणकचंदजी बोथरा यांच्या स्मरणार्थ मोफत हृद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीराला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. हॉस्पिटलच्या रुग्णसेवेत सातत्याने मदत करणार्या बोथरा परिवाराच्या वतीने हॉस्पिटलसाठी डिजीटल एक्स रे मशीन, नेत्रविभागात ग्रामीण रुग्णांना घेऊन येण्यासाठी बस व बालरोग विभागासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
हृद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, शिबीराचे आयोजक प्रेमभाऊ बोथरा, संतोष बोथरा, सतीश बोथरा, संगिता बोथरा, प्रतिभा बोथरा, श्रेया बोथरा, तेजल बोथरा, यश बोथरा, रोनक बोथरा, गौरव बोथरा, बाबुशेठ लोढा, निखील लोढा, मानकशेठ कटारिया, डॉ. वसंत कटारिया, डॉ. आशिष भंडारी, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, प्रकाश छल्लाणी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया यांनी राज्यासह देशाला अल्प दरात बायपास सर्जरीची संकल्पना आनंदऋषीजी हॉस्पिटलने दिली. अवघ्या पन्नास हजार रुपयामध्ये बायपासच्या दर्जेदार शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. छोट्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंतच्या हृदयाच्या सर्व शस्त्रक्रिया अल्प दरात उपलब्ध असल्याने सर्वसामान्यांना मोठा फायदा मिळत आहे. बोथरा परिवार या रुग्णसेवेत तन-मन धनापेक्षा आत्मीयतेने योगदान देत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
प्रेमभाऊ बोथरा म्हणाले की, मानव जाती एक असून, या भावनेने आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या वतीने मानवसेवा केली जात आहे. मानवसेवेच्या कार्यात पारस उद्योगसमुह सातत्याने योगदान देत असून, स्व. माणकचंद बोथरा यांच्या प्रेरणेने हे सेवाकार्य सुरु आहे. दीनदुबळ्यांचे आश्रू पुसण्याचे कार्य करुन, त्यांच्या सेवेसाठी पारस ग्रुप वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. वसंत लोढा यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटल गोरगरिबांसाठी मोठा आधार बनला आहे. या सेवाकार्यात बोथरा परिवाने सर्वस्वी अर्पण केले असल्याचे सांगितले.
महेंद्र (भैय्या) गंधे म्हणाले की, बोथरा परिवाराच्या सामाजिक योगदान व दातृत्वाला सलाम आहे. सामाजिक कामात योगदान देणारा परिवार म्हणून त्यांची शहरात ओळख आहे. हॉस्पिटलच्या उभारणीपासून त्यांचे योगदान कायम राहिले असल्याचे सांगून, त्यांनी हॉस्पिटलच्या भविष्यातील प्रकल्पांसाठी केंद्र व राज्यात असलेल्या भाजप सरकारकडून विविध योजना मंजूर करण्यासाठी सहकार्य राहणार असल्याचे स्पष्ट केले. अभय आगरकर यांनी कत्तलखाण्याचे आरक्षण उठवून, सर्वसामान्यांना नवजीवन देणार्या आरोग्य मंदिराची उभारणी सेवाभावाने करण्यात आली. या हॉस्पिटलमध्ये सुरु असलेल्या सेवाकार्यास नेहमीच पाठबळ राहणार असल्याचे सांगितले. बाबासाहेब वाकळे यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलने सेवाकार्यातून देशभरात आपले नाव उंचावले असल्याचे सांगितले. भानुदास बेरड यांनी आनंद ऋषीजींच्या विचाराने सुरु असलेल्या रुग्णसेवेचे कार्य सर्वसामान्यांचे जीवन फुलविण्याचे कार्य करत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष उभारून त्याचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
श्रेया बोथरा म्हणाल्या की, छोटी मदत देखील एखाद्यासाठी मोठी ठरते. पैसा अनेकांकडे असतो, मात्र तो कोठे योग्य ठिकाणी खर्च करावा याचे भान असले पाहिजे. लहानपणापासूनच समाजसेवेचे बाळकडू घरातून मिळाले असून, भविष्यात अशा पध्दतीनेच सेवा कार्य सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तेजल बोथरा यांनी आयुष्य हे अनमोल असून, ते वाचवण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये केले जात आहे. जीवनात आनंद व आशीर्वादरुपी नवजीवन येथे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबीरात 175 रुग्णांची मोफत हृद्य तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉ. वसंत कटारिया, डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अमित थोपटे, डॉ. विनय छल्लाणी यांनी रुग्णांची तपासणी केली. गरजेनुसार रुग्णांची बायपास, अॅन्जिओप्लास्टी, अॅन्जिओग्राफी, बीएमव्ही व हृद्यातील झडप बदलण्याची शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.
