वंचितांच्या हक्कासाठी व उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचा संघर्ष -ओसामा कोईलख
अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटनेच्या पदाधिकार्यांची आढावा बैठक शहरात नुकतीच पार पडली. यामध्ये संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी परवीन शेख व उपाध्यक्षपदी तनिज शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओसामा कोईलख यांच्या हस्ते दोन्ही महिला पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य अध्यक्ष साहेब खान पठाण, जनसंपर्क अधिकारी सिकंदर शाह, उद्योजक दिलीप गांधी, प्रमोद बेद्रे, उद्योजक गुलाब गुलशन, राज लिंबोरे, प्रशांत काळे, अंजुम सय्यद, शाहीन पठाण, साक्षी काळे आदी उपस्थित होत्या.
ओसामा कोईलख म्हणाले की, मानवाधिकार व त्याची मुल्य जोपासण्याचे काम आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना करीत आहे. वंचितांच्या हक्कासाठी हा संघर्ष असून, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांचे प्रश्न गंभीर बनत असून, बालविवाह, हुंडाबळी, अत्याचार आदी विविध प्रकारे महिलांचे समाजात शोषण होत आहे. हा अन्याय दूर करुन त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा परवीन शेख म्हणाल्या की, महिला-पुरुष समानतेचा विचार रुजण्याची गरज आहे. जेव्हा महिलांचा सन्मान राखला जाईल, तेंव्हा खर्या अर्थाने महिलांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. महिलांना त्यांच्या हक्काची व होणार्या अन्यायाची जाणीव करुन दिल्यास त्या अन्यायाविरोधात पेटून उठतील. महिलांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनीनाथ चव्हाण यांनी केले. आभार सिकंदर शाह यांनी मानले.