अहमदनगर खर्या अर्थाने देशाच्या नकाशावर येणार -नितीन गडकरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांचे स्वप्न असलेले व प्रदीर्घ संघर्षानंतर उभे राहिलेल्या उड्डाणपूलाचे उद्घाटन शनिवारी (19 नोव्हेंबर) केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिकाताई राजळे, स्नेहलता कोल्हे, बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्त्वकांशी उड्डाणपूलाचे उद्घाटनप्रसंगी माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांची आठवण काढली. या पुलासाठी स्व. गांधी यांनी मोठा पाठपुरावा केला. त्यांच्या निधनानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तो पाठपुरावा पूर्णत्वाला नेला. कामात आलेल्या अडीअडचणी व प्रश्नांवर मात करून उड्डाणपूल उभा राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विशेष रूपाने या उड्डाणपुलावर चित्रित करुन त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद मानले.
2008 मध्ये मंत्री झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातून 202 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गाचे रूपांतरण सध्या 869 किलोमीटर महामार्गात झाले आहे. यामध्ये 431 टक्के वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे 36 कामे मंजूर झाली असून, मागील आठ वर्षात 13 कामे पूर्ण झाली आहेत. तर 24 कामे प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यात 30 हजार कोटीचे कामे होणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.
तर ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून अहमदनगर खर्या अर्थाने देशाच्या नकाशावर येणार आहे. सहाशे किलोमीटरचा हा महामार्गाचा 80 हजार कोटीचा प्रकल्प होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
