महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाच्या कार्याचे उपमुख्यमंत्रींकडून कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेच्या समारोपप्रसंगी उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचा अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे व खजिनदार पै. नाना डोंगरे यांनी फडणवीस यांना महाराष्ट्रात नावाजलेले मल्ल स्व.पै. छबुराव लांडगे यांच्या पुतळ्याचे स्मृतीचिन्ह भेट देऊन सत्कार केला. यावेळी पालकमंत्री तथा महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आ. प्रा. राम शिंदे, आ. बबनराव पाचपुते, सुवेंद्र गांधी, अनिल शिंदे, दिलीप सातपुते, वसंत लोढा, भानुदास बेरड, पै. सुभाष लोंढे, अभिषेक भगत, महेश लोंढे, युवराज पठारे, मोहन हिरनवाळे, विलास चव्हाण, प्रताप चिंधे, संग्राम शेळके, गोरख खंडागळे, सुनिल भिंगारे, आनंदा शेळके, पै. संदीप डोंगरे आदी जिल्हा तालिम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुस्ती खेळाला सर्वात प्रथम छत्रपती शिवरायांनी प्रोत्साहन दिले. यानंतर शाहू महाराजांनी त्यांच्या काळात तालीम बांधल्या व या खेळाला चालना दिली. हाच वारसा या स्पर्धेतून पुढे नेण्यात आला आहे. शाहू महाराजांनी विजेत्या मल्लांना चांदीची गदा देण्याची परंपरा निर्माण केली व आता कुस्ती मल्लांना सोन्याची गदा देण्याची नवीन परंपरा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाचे उत्तम प्रकारे कार्य सुरू असल्याचे कौतुक त्यांनी केले.
जिल्हा तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे यांनी या स्पर्धेने कुस्ती खेळाला चालना मिळाली आहे. केंद्र व राज्य सरकार खेळाला चालना देण्याचे काम करत असल्याची भावना व्यक्त केली. पै. नाना डोंगरे यांनी कुस्तीला चांगले दिवस आले असून, अनेक चांगले मल्ल पुढे येत आहे. या कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लांना लाखो रुपयांचे बक्षीस देण्यात आल्याने खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.