कुस्तीच्या नवीन नियमावली संदर्भात चर्चा
नवनिर्वाचित पंच प्रमुख व क्रीडा समितीच्या पदाधिकार्यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा तालिम संघाची बैठक नुकतीच सर्जेपुरा येथील जिल्हा तालिम संघाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्या विविध कुस्ती स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. तर कुस्तीच्या नवीन नियमावली संदर्भात चर्चा करण्यात आली.
अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय अडसुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै.नाना डोंगरे, सचिव धनंजय जाधव, नगरसेवक तथा उपाध्यक्ष पै. युवराज पठारे, नगर शहार अध्यक्ष पै. नामदेव लंगोट, पै.विलास चव्हाण, माजी नगरसेवक सुनील भिंगारे, पै.मोहन हिरणावळे, पाथर्डी तालुका तालिम संघाचे सचिव पै.पप्पू शिरसाठ, अकोले तालुका तालिम संघाचे अध्यक्ष पै.सोमेश्वर (बबलू) धुमाळ, शेवगाव तालुका तालिम संघाचे अध्यक्ष पै.विक्रम बारावकर, नेवासा तालुका तालिम संघाचे सचिव पै.संभाजी निकाळजे, पंच पै. गणेश जाधव, ईश्वर तोरडमल, पै. शुभम जाधव, पै. गणेश जाधव, संतोष देठे, शहारूख शेख आदी उपस्थित होते.
यावेळी अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे पंच प्रमुख म्हणून संभाजी निकाळजे यांची निवड करण्यात आली. नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्ष पदी पै. नाना डोंगरे, पाथर्डी तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी पै.पप्पू शिरसाठ, नेवासा तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी पै.संभाजी निकाळजे तसेच अकोला तालुका तालिम सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी शाम शेटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कुस्ती मल्लांसाठी नियमावली व या तालुका संघा स्पर्धेचा मान
बैठकीत कुठल्याही कुस्ती स्पर्धेत गैरवर्तन करणार्या मल्लास 1 वर्षाची जिल्ह्यातील स्पर्धेत बंदी, जिल्हा निवडचाचणीसाठी वजनामध्ये 1 किलोची सूट, जिल्हा स्पर्धेत खेळण्यासाठी तालुका तालिम संघाचे ओळखपत्र असल्याशिवाय खेळण्यासाठी परवानगी आवश्यक असल्याचे निर्णय घेण्यात आले. तर महाराष्ट्र केसरीसाठी जिल्ह्याची निवडचाचणी अकोला तालिम संघाला देण्यात आली. ग्रीको रोमन व वरिष्ठ महिला निवड चाचणी नगर तालुका तालिम सेवा संघाला तर महिला केसरी स्पर्धा नेवासा तालुका तालिम संघाला देण्याचा ठराव घेण्यात आला.
