• Thu. Mar 13th, 2025

अहमदनगरच्या शिवम लोहकरेला आशियाई ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदक

ByMirror

Jun 6, 2023

2016 नंतर पदक पटकाविणारा देशातील ठरला दुसरा खेळाडू

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील भालाफेक पटू शिवम लोहकरे याने दक्षिण कोरियातील येचॉन येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत देशाचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक पटकाविले. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या नीरज चोप्राने 2016 च्या या स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले होते. त्यानंतर शिवमला हा पदक पटकाविण्याचा मान मिळाला आहे.

शिवम लोहकरे


या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन व जिल्ह्यातील सर्व अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले आहे. नेवासा तालुक्यातील गणेशवाडी गावाचा 19 वर्षीय शिवमने पहिल्याच प्रयत्नात 72.34 मीटर अंतरावर भाला फेकला. सुवर्णपदकासाठी त्याची लढत तायपईच्या चाओ हुंगसोबत होती. चाओ ने 72.85 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक निश्‍चित केले, तर शिवमला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.


शिवमने प्रारंभी प्रशांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भालाफेकीत धडे गिरवल्यानंतर, तो गेल्या तीन वर्षापासून पुण्यात माजी आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू काशिनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तो श्री शैनेश्‍वर ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी असून, इयत्ता 12 मध्ये शिकत आहे. शिवमने मिळवलेल्या यशामुळे अहमदनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनला चांगल्या कामाची पावती मिळाली आहे.

या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष माजी खाजदार प्रसाद तनपुरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते रंगनाथ डागवाले, सुनील जाधव, सचिव दिनेश भालेराव, क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, ज्ञानेश्‍वर खुरांगे, विशाल गर्जे, प्रा. बाळासाहेब विखे, संदीप घावटे, महेंद्र हिंगे, रमेश वाघमारे, संदीप हरदे, राहुल काळे, जगन गवांदे यांनी शिवमचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *