रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचे न्यायमूर्ती जैन यांच्याकडून कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पसंख्यांक संस्थेच्या समस्येबाबत चर्चा करून अडचणी जाणून घेण्यासाठी शहरात आलेले राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र कुमार जैन यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागच्या प्रशासकीय कार्यालयास भेट दिली.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी न्यायमूर्ती जैन यांचे स्वागत करुन सत्कार केला. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस आदी उपस्थित होते.
ज्ञानदेव पांडुळे यांनी जैन यांना रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेची उभारणी कशी केली? बहुजन समाजाला प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. पांडूळे म्हणाले की, संस्थेच्या महाराष्ट्रात तसेच कर्नाटकमध्ये अनेक शाखा असून महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, प्राथमिक शाळा, आश्रम शाळा, अध्यापक विद्यालय अशा 737 शाखांचा कारभार पाच प्रशासकीय विभागामार्फत चालविला जातो. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील तसेच गरीब घरातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने केले आहे. सध्या खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती जैन यांनी रयत शिक्षण संस्थेचे सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले.