• Wed. Feb 5th, 2025

अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने चर्मकार विकास संघाचे गुरुवारी उपोषण

ByMirror

Oct 25, 2022

त्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन करावे

तर आरोपींना अटक करुन मुलींचा शोध लावण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन, दीड महिने उलटूनही तपास लागत नसल्याने चर्मकार विकास संघाच्या वतीने पिडीत कुटुंबीयांसह गुरुवारी (दि.27 ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी दिली.
या प्रकरणात पोलीस निरीक्षक बेपत्ता झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनाच दमदाटी करुन हाकलून लावत असल्याचा चर्मकार विकास संघाने आरोप केला असून, संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची चौकशी करून निलंबन करावे, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ आरोपींना तात्काळ अटक करावी, बेपत्ता मुलीचा तात्काळ शोध लावण्याची मागणी करण्यात आली आहे.


श्रीगोंदा येथील एका गावात राहणार्‍या हातावर पोट असलेल्या चर्मकार समाजातील शालेय विद्यार्थिनी बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी 29 ऑगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊन तब्बल 50 दिवस झाले असून, पोलीस निरीक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्याने सदर मुलीचा तपास लागलेला नाही. बेपत्ता अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबातील सदस्य पोलीस निरीक्षक यांच्याकडे चौकशीसाठी वेळोवेळी विनवणी करीत होते. परंतु पोलीस निरीक्षक यांनी संबंधित कुटुंबाला धमकावून हाकलून लावले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


बेपत्ता मुलगी सापडत नाही म्हणून, मुलीच्या कुटुंबीयांनी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आरोपी व आरोपींना मदत करणार्‍या लोकांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. मात्र आजपर्यंत बेपत्ता मुलीचा शोध लागलेला नसून, आरोपी मोकाट फिरत आहे. या घटनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. पोलीस निरीक्षक आपल्या कर्तव्यात कसूर करुन बेपत्ता मुलीचा शोध लावण्यासाठी कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देण्यात आले होते. याप्रकरणी कारवाई होत नसल्याने संघटनेने उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *