पारनेर तालुक्यातील खडकवाडी खून प्रकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे मयताचे अपहरण करुन खून केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 21 मार्च रोजी जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने हा निकाल देण्यात आला.
26 जून 2016 रोजी पारनेर तालुक्यातील खडकवाडी गावात मयताचे घरासमोरून आरोपींनी अपहरण केल्याचे आरोप आरोपींवर होते. पोलिसांच्या तापासात आरोपींनी मयताचे अपहरण त्यांच्या नातेवाईक स्त्रीची मयताने छेड काढल्यामुळे केल्याचे निष्पन्न झाले होते. अपहरण केल्यानंतर आरोपींनी 28 जून 2016 रोजी मयताचा खून करून त्याचे प्रेत नांदूर खंदरमाळ गावाच्या शिवारात जांबुत घाटाच्या माथ्यावर एका झाडाला त्याचे प्रेत गळफास लावलेल्या अवस्थेत लटकून दिल्याचे आरोप आरोपींवर करण्यात आले होते. त्या अनुषंगाने तपास करून पारनेर पोलिसांनी आरोपींना अटक करून, आरोपीविरुद्ध सर्व पुरावे गोळा केले व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर खून खटल्यामध्ये सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी एकूण 14 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या. त्यानुसार आरोपीतर्फे अॅड. परिमल फळे यांनी साक्षीदारांचे उलट तपास घेतले. त्यानुसार आरोपीतर्फे अॅड. फळे यांनी हा खून त्यांच्या अशिलांनी केला नसल्याचा बचाव केला. साक्षीदारांचे घेतलेले उलटतपास व न्यायालयासमोर केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश एम.आर. नातू यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सदर खून खटल्याकामी अॅड. परिमल फळे यांना अॅड. सागर गायकवाड, अॅड. अभिनव पालवे, अॅड. आशिष पोटे, अॅड. अक्षय कुलट यांनी सहाय्य केले.