सुभेदार मल्हारराव होळकर जयंती कार्यक्रमात सामाजिक कार्य करणार्या कर्तृत्ववानांचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- नामांतराचा विषय चर्चेला जात असताना, अगोदर जिल्हा विभाजन होण्याची गरज आहे. अहिल्यादेवींचे जन्मस्थान आपल्या जिल्ह्यातच असून, या नामांतराचा मुद्दा सर्वांच्या मनात आहे. जिल्हा विभाजनानंतर पुढे जावून तीच सर्वांची भूमिका राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील माऊली सभागृहात आयोजित सुभेदार मल्हारराव होळकर जयंती कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते. प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी अहिल्यादेवी धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती दातीर, जिल्हा परिषद सहाय्यक प्रशासनाधिकारी शिवाजी भिटे, समाज कल्याण निरीक्षक तुकाराम सातपुते, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, डॉ. श्रीकांत फाऊंडेशनचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत (काका) शेळके, उज्वला राजगुरू, शर्मिला नलावडे, मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे, विजय तमनर, अशोक वीरकर, लक्ष्मण नजन, संध्या देशमुख आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, पुरस्काराने जबाबदारी वाढते. स्वतःला सिद्ध करावे लागते, तेंव्हा समाजात सन्मान मिळतो. संस्थेने निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्यांचा केलेला सन्मान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कांतीलाल जाडकर म्हणाले की, उपेक्षित घटकांसाठी जय मल्हार सामाजिक संस्था कार्यरत असून, समाजातील वंचितांना मदतीचा हात देण्याचे काम करत आहे. सामाजिक योगदान देणार्यांना पुरस्कार रूपाने प्रेरणा देण्याचे काम करण्यात आले आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी सुभेदार मल्हारराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करुन कार्यक्रमाचे प्रारंभ झाले. उपस्थितांच्या हस्ते धनगर समाजातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तर विविध क्षेत्रांमध्ये निस्वार्थ भावनेने सामाजिक काम करणार्या कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले.

जिल्हा परिषद सहाय्यक प्रशासनाधिकारी शिवाजी भिटे म्हणाले की, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम सामाजिक संघटनेच्या माध्यमातून होत आहे. समाजाने काय दिले यापेक्षा, समाजासाठी आपण काय केले? हे विचार करण्याची गरज आहे. संस्थेचे समाजाला एकत्र जोडून ठेवण्याचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. शेवटचा घटक असलेला धनगर समाज आजही बर्याच योजना पासून वंचित आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना सामुदायिक प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर म्हणाले की, समाज सुधारण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मात्र सध्या पारंपारिक शिक्षणापेक्षा नवीन शैक्षणिक धोरणाचा स्विकार करावा लागणार आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे वारे वाहत आहे. स्पर्धेच्या जगात या शिक्षण पध्दतीचा स्विकार करुन तंत्रज्ञान व व्यावसायिक शिक्षणाची कास धरावी लागेल, तेंव्हाच समाजाला प्रगती साधता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतिहास तज्ञ प्रा.डॉ. नवनाथ वाव्हळ म्हणाले की, इतिहास माणसाला शहाणपण शिकवतो. महिलांचा ज्वाजल्य इतिहास विसरल्याने समाजात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. यामुळे राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या इतिहासाला उजाळा देण्याची गरज आहे.
अनिताताई काळे यांनी मल्हारराव होळकर व अहिल्याबाई होळकर यांच्या इतिहासाला उजाळा दिला. तर जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन जेव्हा समाजकार्य निर्माण होते, तेव्हाच त्या व्यक्तीची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती कुलकर्णी यांनी केले. आभार निवृत्ती दातीर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप काळभोर, मुकेश दुधाडे, महेश कलशेट्टी, पप्पू भगत, निलम जाडकर, शरद दारकुंडे, प्रकाश इथापे यांनी परिश्रम घेतले.