पत्रकार परिषदेत जागा मालक पटवारी यांची माहिती
जागा बळकवणार्यांविरोधात पोलीसांकडे तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मोकळ्या जागेवर ताबा मारण्याचे प्रकरण गाजत असताना, अमन अमित पटवारी (रा. जालना, जि. संभाजीनगर) यांच्या मालकीच्या वाकोडी रोड, भवानीनगर येथील 30 गुंठे जागेची संरक्षक भिंत जेसीबीद्वारे तोडून, राजकीय वरदहस्त असलेल्या अज्ञात व्यक्ती दहशतीने जागा बळकाविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी शनिवारी (दि.8 जुलै) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तर या संदर्भात तक्रार अर्ज देखील जिल्हा पोलीस अधीक्षक व कोतवालीचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरात सध्या मोकळ्या जमिनी बाळकवण्याचे प्रकार सुरू आहे. मौजे माळीवाडा, येथील गट नं. 8/12 व 9/3 भवानीनगर जवळ वाकोडी रोड, भोसले लॉनच्या अलीकडे अमन अमित पटवारी यांच्या मालकीची 30 गुंठे जमीन आहे. त्याची सरकारी मोजणी करुन त्याला संरक्षक भिंत टाकण्याचे काम या जागेची व्यवस्था पाहणारे जाकिर पठाण यांना सांगितले होते. 5 जुलै रोजी या 30 गुंठे प्लॉटवर पक्के असे सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत बांधली. 7 जुलै रोजी पुन्हा जाकीर पठाण यांनी या प्लॉटवर जाऊन पाहिले असता संपूर्ण जागेची संरक्षक भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकण्यात आल्याचे अमन पटवारी यांनी सांगितले.
तर ही जागा शेवंताबाई उर्फ सत्यभामा दामोधर सोज्वळ, दामोधर यशवंत सोज्वळ, ज्ञानेश्वर दामोधर सोज्वळ, संभाजी दामोधर सोज्वळ यांच्याकडून 29 नोव्हेंबर 2019 रोजी कायदेशीर व्यवहार करून आणि या जागेवर असलेले सर्व वारस यांच्याकडून विकत घेतला होता. मात्र त्यावेळी या जागेवर सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी निर्मल मुथा यांनी अहमदनगर तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे हरकत घेतली होती. त्या हरकत अर्जावर रीतसर सुनावणी होऊन 24 जून 2020 रोजी हा अर्ज निकाली काढला होता. आमचे नाव सातबारा उतार्यावर कायम ठेवावे असा आदेश दिला होता. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, नगर यांच्याकडे अपील झाल्यानंतर तेथेही सुनावणी झाल्यानंतर निर्मल मुथा यांनी आमच्याविरुद्ध केलेली हरकत फेटाळून लावत आमचे नाव सातबारा उतर्यावर कायम ठेवावेत असे आदेश 22 डिसेंबर 2021 रोजी दिले होते. त्यानंतर याबाबत कुठलीही न्यायालतीन नोटीस अथवा कुठलाही कायदेशीर कारवाई बाबत आमच्याकडे कोणतीही नोटीस आलेली नसल्याचे पटवारी यांनी म्हंटले आहे.
आज तगायात सातबारा उतार्यावर आमचे नाव कायम आहे. मात्र या जागेवर बांधलेले 3 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेली संरक्षक भिंत तोडून आमचे नुकसान करण्यात आले. यामागे कोणाचे तरी राजकीय हस्तक्षेप असून, आमच्या प्लॉटवर ताबा मारण्यासाठी आम्हाला कोणीतरी त्रास देत असल्याचे समोर येऊ लागले आहे. वास्तविक पाहता हा प्लॉट विक्रीसाठी काढला असताना काही अज्ञात लोक या प्लॉटवर लेटीकेशन असल्याच्या अफवा उठवत आहेत. सर्व कायदेशीर बाबी पडताळून पाहून आम्ही ही जागा खरेदी केली होती. त्याबाबत रीतसर पेपरमध्ये नोटीसही देण्यात आली होती. मात्र त्यावेळी कोणतीही हरकत घेण्यात आली नाही. मात्र आता अज्ञात लोक आमच्या जागेवर येऊन ताबा मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमच्या निदर्शनास येत असल्याचे पटवारी यांनी आरोप केला आहे.
या जागेबाबत न्यायालयात कोणताही दावा सुरु नसून, या जागेचा कोणताही दुसरा मालक नाही. हा त्रास आम्हाला जाणून-बुजून देण्यात येत आहे. या मागील सूत्रधार व संरक्षक भिंत तोडणार्याचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आणि जागा बळकवणार्यापासून संरक्षण मिळण्याची पोलीसांकडे तक्रार केली असल्याचेही पटवारी यांनी यावेळी स्पष्ट केले.