• Thu. Oct 16th, 2025

संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बसपाचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

ByMirror

Aug 3, 2023

महत्त्वाच्या मुद्दयांना बगल देण्यासाठी भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा बोलवता धनी भाजप असल्याचा आरोप

गृहमंत्री यांच्या निवासस्थानी स्वातंत्र्य दिनी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले यांच्यासह इतर महापुरुषांबद्दल अपमानास्पद चुकीचे वक्तव्य करुन त्यांचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्यातील महत्त्वाच्या मुद्दयांना बगल देण्यासाठी भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा बोलवता धनी भाजप असल्याचा आरोप करण्यात आला. तर भिडे यांना अटक न झाल्यास राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्वातंत्र्य दिनी (दि.15 ऑगस्ट) ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.


या आंदोलनात यावेळी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी सुनील ओहळ, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, मेजर राजू शिंदे, बाम सेफचे अध्यक्ष सर्जेराव साळवे, मोहन काळे, अशोक जाधव, राजू खरात, सुनील मगर, आकाश रोडे, जाकीर शहा, दीपक साळवे, संजीव फडतरे, भीमराज जाधव, सर्जेराव साळवे, विकास चव्हाण, मच्छिंद्र ढोकणे, रमजान शेख, रामचंद्र पवार, संजय पवार, संजय संसारे, शशिकांत वालेकर, प्रकाश अहिरे, संजय संसारे, कैलास कोळगे आदींसह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल संभाजी भिडे याने केलेल्या वक्तव्याने संपूर्ण बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. बौद्धिक दिवाळखोरी व राजकीय हित साधण्यासाठी महापुरुषांचा अवमान केला जात आहे. समाजात दुही निर्माण करण्याच्या उद्देशाने महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना राज्य सरकार मोकाट सोडत असल्याने वारंवार त्यांच्याकडून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहे. यापूर्वी महात्मा गांधी व इतर महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले. मात्र भिडे यांना राज्य सरकारचे अभय असल्याने तो बिनधास्तपणे गरळ ओकत असल्याचा आरोप बसपाच्या वतीने करण्यात आला आहे.


देशासह राज्यातील अनेक महत्त्वांच्या मुद्दयांना बगल देण्यासाठी व नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी संभाजी भिडे, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांसारख्या लोकांचा वापर सत्ताधारी पक्ष करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर भिडे यांच्यावर फक्त गुन्हे नको, तर त्यांना अटक करण्याची मागणी बसपाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *