तपास अधिकारीची तातडीने बदली करण्याची मागणी
बहुजन समाज पार्टीचे श्रीगोंदा तहसिल कार्यालया समोर उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा येथील दूध भेसळ प्रकरणातील तपास अधिकारीची तातडीने बदली करुन हा तपास सीआयडीकडे वर्ग करावा व श्रीगोंदा तालुक्यात आदिवासी, मागासवर्गीय कुटुंबीयांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने श्रीगोंदा तहसिल कार्यालया समोर उपोषण करण्यात आले.
या उपोषणात बसपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील ओहळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, शंकर भैलुमे, श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष राहुल छत्तीशे, शहराध्यक्ष मेजर राजू शिंदे, अॅड. संभाजी बोरुडे, जिवाजी घोडके, भगवानराव गोरखे, शहर सचिव रामचंद्र पवार, गणेश बागुल, नितीन जावळे, अंबादास घोडके, मोहन काळे, ज्ञानदेव शिरवाळे, सुनील आढाव, यशवंत जौंजाळ, बाबासाहेब ओहोळ, सचिन सोनवणे, महतीकुमार दोशी, विठ्ठल म्हस्के, संतोष जौंजाळ, विठ्ठल म्हस्के, कचरू लष्करे आदी सहभागी झाले होते.

पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे व तपासातील त्रुटीमुळे लोकांना दुधाच्या माध्यमातून वीष पाजणारे गंभीर गुन्ह्यातील आरोपी जामीनावर सुटले आहे. तर काहींना अटकपूर्व जामीन झाला आहे. यामध्ये अन्न औषध प्रशासन विभागाची भूमिका देखील संशयास्पद आहे. आरोपी फरार असताना प्रशासनाच्या आशीर्वादाने गुन्हेगारांच्या दूध डेअरी पुन्हा सुरू करण्यात आल्या. तपास अधिकार्यांचे व आरोपींचे नातेसंबंध असल्याचे बोलले जात असून त्या संदर्भात चौकशी होण्यासाठी उपोषणकर्त्यांनी लक्ष वेधले. तहसिल कार्यालया समोर जोरदार निदर्शने करुन प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली.
श्रीगोंदा दूध भेसळ प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, या प्रकरणातील तपास अधिकारीची तातडीने बदली करण्यात यावी व त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हावी, अन्न औषध प्रशासन विभागाच्या संशयास्पद भूमिकेची चौकशी व्हावी, दूध भेसळ प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करून दूध डेअरी मालकाच्या डेअरीचे परवाने रद्द करण्यात यावे, अहमदनगर जिल्हा दलित, आदिवासी अत्याचार ग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, श्रीगोंदा तालुक्यामध्ये दलित अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या, बापू माने या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.